सोनू सूदने केली बॉलिवूड पार्ट्यांची पोलखोल; म्हणाला, "कॅमेऱ्यासमोरील अभिनयापेक्षा तिथे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:45 IST2025-01-04T14:44:07+5:302025-01-04T14:45:10+5:30
बॉलिवूड पार्टी म्हणजे केवळ दिखावा...सोनू सूद स्पष्टच बोलला

सोनू सूदने केली बॉलिवूड पार्ट्यांची पोलखोल; म्हणाला, "कॅमेऱ्यासमोरील अभिनयापेक्षा तिथे..."
अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सध्या 'फतेह' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सोनूने स्वत: हा सिनेमा लिहिला आहे आणि याचं दिग्दर्शनही केलं आहे. त्याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका केली आहे. 'दबंग' मधला छेदी सिंह असो किंवा 'सिंबा'मधली निगेटिव्ह भूमिका असो त्याने वेळोवेळी छाप पाडली आहे. आता 'फतेह' मध्ये तो अँग्री लूकमध्ये असून अनेकांना ट्रेलर आवडला आहे. नुकतंच सोनूने सिनेमाच्या प्रमोशनवेळी बॉलिवूड इंडस्ट्रीची पोलखोल केलीये.
बॉलिवूड पार्टी हा एक नेहमीच चर्चेतला विषय असतो. अनेक कलाकार कोणत्याच पार्ट्यांमध्ये दिसत नाही. त्यातच एक सोनू सूद. याविषयी 'मॅशेबल इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सोनू म्हणाला, "मी कॅमेऱ्यासमोरच मेहनत घेतो. कोणाच्या घरी पार्टीला जाऊन का एफर्ट करु. पार्टी केल्याने करिअर घडत नाही. बॉलिवूड पार्टीला गेल्याने एखाद्याचं करिअर बनलंही असेल. पण मी ना ड्रिंक करतो ना स्मोक करतो. त्यामुळे मी जातच नाही. या पार्ट्यांना गेलो की मला खूप हरवल्यासारखं वाटतं."
तो पुढे म्हणाला, "मी जसा नाहीच आहे तसा असण्याचा दिखावा करु शकत नाही. मला अनेक बॉलिवूड पार्ट्या या खोट्या म्हणजेच दिखावा वाटतात. बरेच लोक तर या पार्ट्यांमध्ये कॅमेऱ्या समोर केलेल्या अभिनयापेक्षाही जास्त चांगला अभिनय करतात. कदाचित असं करुन त्यांना एखादं रिवॉर्ड मिळत असेल."
याआधी कंगना रणौत, आमिर खान, पंकज त्रिपाठी, अजय देवगण यांनीही बॉलिवूड पार्ट्यांना जात नाही असं स्पष्ट सांगितलं होतं. सोनू सूदचा 'फतेह' हा सिनेमा १० जानेवारी रोजी रिलीज होत आहे. यामध्ये त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिज मुख्य भूमिकेत आहे.