"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 09:25 IST2025-12-20T09:24:53+5:302025-12-20T09:25:38+5:30
सोनाक्षी सिन्हाची आई स्पष्टच बोलली, 'मला दोन वर्षांपूर्वीच तिने सांगितलं...'

"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हाने गेल्या वर्षी बॉयफरेंड जहीर इकबालसोबत कोर्ट मॅरेज केलं. आंतरधर्मीय विवाह केल्याने तिच्यावर खूप टीका झाली. तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि दोन्ही भाऊ लव-कुश या लग्नाच्या विरोधात होते. शत्रुघ्न सिन्हा यांची समजूत घालायला २ वर्ष लागली असा खुलासा नुकताच पूनम सिन्हा यांनी केला आहे. फराह खानच्या युट्यूब व्लॉगमध्ये पूनम सिन्हांनी यावर प्रतिक्रिया दिली.
दिग्दर्शिका फराह खान तिच्या युट्यूब चॅनलवर विविध सेलिब्रिटींची आलिशान घरं दाखवते. त्यांच्या घरी स्पेशल डिश कोणती बनवली जाते याचंही प्रात्यक्षिक दाखवते. तिच्यासोबत तिचा आचारी दिलीप असतो. तसंच ती सेलिब्रिटींशी खूप गप्पाही मारते, विनोद करते. नुकतंच तिने सोनाक्षी आणि जहीर इकबालच्या घरी भेट दिली. यावेळी सोनाक्षीची आई पूनम सिन्हाही होत्या. फराह खानने विचारलं, 'सोनाक्षी आणि जहीर पाच वर्ष डेट करत होते हे तुम्हाला माहित होतं का?' यावर पूनम सिन्हा म्हणाल्या, 'नाही, मला नव्हतं माहित.'. तेव्हा सोनाक्ष लगेच आईला म्हणाली, 'मम्मी, खोटं बोलू नको. मी सर्वात आधी तुलाच सांगितलं होतं. तू बाबांना याबद्दल सांगू नको.'
पूनम सिन्हा म्हणाल्या, "मला याबद्दल दोन वर्षांपूर्वीच समजलं. या दोन वर्षात मी लेकीचं हे नातं स्वीकारण्यासाठी सोनाक्षीच्या बाबांची सतत समजूत घालत होते. बाकी मला आधीपासून दोघांवर थोडी शंका होतीच जेव्हा जहीर घरात कामही करायचा. आईपासू काहीच लपून राहत नाही."
यानंतर जहीरची आई मुमताज रतनसीही तिथे येतात. तेव्हा फराह विचारते, 'तुमच्या दोघांची आई एकमेकींना कधी भेटल्या?' यावर सोनाक्षी सांगते, "त्या दोन्ही काही वर्षांपूर्वीच भेटल्या. हुमा कुरेशीने घरी पार्टी ठेवली होती ज्यात आम्ही आमच्या पालकांनाही बोलावलं होतं. पार्टीत त्या पहिल्यांदा अनऑफिशियली भेटल्या. तेव्हा त्यांना आमच्या नात्याविषयी माहित नव्हतं."
सोनाक्षी आणि जहीरने गेल्या वर्षी २३ जून रोजी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर दोघांनी मित्रपरिवारासाठी मोठी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आले होते.