Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 16:41 IST2024-10-20T16:40:48+5:302024-10-20T16:41:13+5:30
Somy Ali And Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर सलमान चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने आजतकशी खास संवाद साधला आहे.
सोमीच्या म्हणण्यानुसार, "सलमानला हे माहीत नव्हतं की, बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो. मला त्याच्या वतीने माफी मागायची आहे. सलमानच्या मागे लागू नका. माझा सलमानशी काहीही संबंध नाही. २०१२ मध्ये मी त्याच्याशी शेवटचं बोलली होती. मला फक्त एवढंच वाटतं की, कोणाचीही हत्या होऊ नये. माझा यामध्ये कोणताच फायदा नाही."
"मला कोणतीही प्रसिद्धी नको आहे. पण मला कोणाचीही हत्या होऊ नये असंच वाटतं. कोणी कोणाचंही नुकसान करू नये. मी हिंसाचाराच्या विरोधात आहे. मी सलमानसोबत अनेकदा शिकारीसाठी गेले. मी नोव्हेंबरमध्ये लॉरेन्स बिश्नोईला भेटणार आहे. बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतं हे सलमानला माहीतच नव्हतं, त्यामुळे यात काही लॉजिक नाही."
"मला लॉरेन्सशी बोलायचं आहे. कारण हे घडले तेव्हा तो ५ वर्षांचा होता. त्याला समजवण्याची खूप गरज आहे. हे तुम्ही कोणत्याही मुलाच्या मनात घातलं की सलमानने तुमच्या देवाला मारलं तर त्याला काय वाटेल. तो आता ३३ वर्षांचा आहे. त्याला बसवून समजावून सांगण्याची गरज आहे की, हे गुन्हेगारीचं चक्र मोडून काढणं आवश्यक आहे. सलमानने काहीही केलं नसताना माफी का मागायची. हे कोणतं लॉजिक आहे?"
"मला सलमानचे कुटुंबीय किंवा मित्र, काजोल, तब्बू, अजय देवगण, रवीना किंवा सैफ... कोणाचंही नुकसान होऊ नये असं वाटतं. आपल्याकडे कायदा आणि न्याय आहे. कोणाचीही हत्या होऊ नये. हे चुकीचे आहे. म्हणूनच लॉरेन्सने माझ्याशी बोलावं असं मला वाटतं. मी त्याला समजावून सांगेन की हे चुकीचं आहे. सलमान चांगला माणूस आहे.''असंही सोमी अलीने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी देखील तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून लॉरेन्स बिश्नोईशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती.