"मी तुम्हा सर्वांना..."; मृत्यूच्या आधी जुबीन गर्गचा शेवटचा व्हिडीओ आला समोर, चाहते झाले भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 17:59 IST2025-09-19T17:58:08+5:302025-09-19T17:59:56+5:30
गायक जुबीन गर्गचा सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना मृत्यू झाला. जुबीनचा शेवटचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलंय

"मी तुम्हा सर्वांना..."; मृत्यूच्या आधी जुबीन गर्गचा शेवटचा व्हिडीओ आला समोर, चाहते झाले भावुक
प्रसिद्ध गायक जुबीन गर्गचं वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झालं. जुबीनच्या मृत्यूमुळे संगीत जगतात आणि त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झालेल्या एका अपघातात जुबीनला त्याचा जीव गमवावा लागला. 'गँगस्टर', 'क्रिश ३' यांसारख्या प्रसिद्ध सिनेमात जुबीनने गाणी गायली. 'या अली' गाण्यामुळे जुबीनला चांगलीच लोकप्रियता मिळाली. अशातच मृत्यूपूर्वी जुबीनचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून जुबीनचे चाहते भावुक झाले आहेत.
हा होता जुबिनचा शेवटचा व्हिडीओ
जुबीनच्या सोशल मीडियावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ गायकाच्या मृत्यूच्या काही तास आधीचा आहे. जुबीनने स्वतः हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये ‘चौथ्या ईस्ट इंडिया महोत्सवा’साठी जुबीनने त्याच्या चाहत्यांना आमंत्रण दिलं होतं. हा महोत्सव २० आणि २१ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये होणार होता. या कॉन्सर्टमध्ये जुबीन त्याची लोकप्रिय हिंदी, बंगाली आणि आसामी गाणी सादर करणार होता. जुबीनच्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण होता. पण त्याआधीच गायकाचा मृत्यू झाल्याने चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
जुबीनचा हा शेवटचा व्हिडिओ पाहताच चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. जुबीनच्या निधनाने संगीत जगताचं मोठं नुकसान झालं आहे. विशेषतः आसामी संगीत जगतासाठी जुबीनचं मोठं योगदान होतं. जुबीन गर्गचं 'गँगस्टर' सिनेमातील 'या अली' हे गाणं चांगलंच गाजलं. तसंच 'क्रिश ३'मध्ये हृतिक रोशन, कंगना राणौतवर चित्रीत झालेलं 'दिल तू ही बता' हेही गाणं जुबीननेच गायलं होतं. तसंच सुनिधी चौहानसोबत त्याने 'झुम बराबर झुम' हे लोकप्रिय गाणंही गायलं.