"खून, खंडणी, चोरी..." सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:58 IST2025-01-16T14:57:09+5:302025-01-16T14:58:13+5:30

सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडसह राजकीय नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Sharad Pawar Reaction On Saif Ali Khan Injured In Knife Attack At Mumbai Home Updates | "खून, खंडणी, चोरी..." सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

"खून, खंडणी, चोरी..." सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar On Saif Ali Khan:  बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेत्रा सैफ अली खानवर (Saif Ali Khan Injured In Knife Attack) मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. सैफ अली खानवर चाकूने अनेक वार करून जखमी केलं. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती आता स्थिर असून तो सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. या हल्ल्यानंतर बॉलिवूडसह राजकीय नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता रोहित पवार यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 


कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार आणि शरद पवार गटाचे नेते रोहित पवार  यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे. त्यांनी लिहलं, "अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चोरट्याने चाकू हल्ला केल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. ते लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा! पण या हल्ल्याच्या निमित्ताने राज्यातील गुन्हेगारी कोणत्या स्तराला गेली, हे दिसून येतं. खून, खंडणी, चोरी हे गंभीर गुन्हे सर्रास घडत असून मुंबईत वांद्रे सारख्या भागातही सुरक्षित वातावरण नाही, हे चिंताजनक आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाचं काय? सरकार गंभीर होऊन या गुन्हेगारीला समूळ उखडून टाकणार की नाही, हा खरा प्रश्न आहे", असं त्यांनी म्हटलं. 


सध्या सैफ अली खान मुंबईतील लीलावती रुग्णालयात आहे. सैफ अली खानच्या शरीरावर ६ जखमा आहेत. यातील दोन जखमा गंभीर होत्या. दोन ठिकाणी किरकोळ दुखापत आहे. तर दोन जागी खरचटलं आहे. सैफच्या शरीरातून सुमारे अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. सध्या अभिनेत्याला ICU मध्ये ठेवण्यात आलं आहे.

सैफच्या घरी नेमकं काय घडलं?

हल्लेखोराने सैफ अली खानच्या घरात मागच्या बाजूने प्रवेश केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या मदतनीसला भेटण्यासाठी हल्लेखोर घरात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सैफवर हल्ला करण्याअगोदर हल्लेखोर सैफ-करीनाचा मुलगा तैमुरच्या खोलीकडे जात होता. हल्लेखोराला तैमुरच्या खोलीच्या दिशेने जाताना सैफच्या घरातील मोलकरणीने पाहिलं आणि आरडाओरडा सुरू केला. मोलकरणीने आरडाओरडा केल्यानंतर बाजूच्याच खोलीत झोपलेला सैफ अली खान जागा झाला आणि बाहेर आला. सैफने हल्लेखोर आणि मोरकणीला पाहिलं आणि हल्लेखोरला रोखण्यासाठी तो धावला. या झटापटीत हल्लेखोराने सैफवर चाकूने ६ वार केले. यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर संधी साधून चोर तिथून पळून गेला. तोपर्यंत कुटुंबातील इतर सदस्य जागे झाले. अज्ञात व्यक्ती नेमका कोणत्या उद्देशानेच शिरला होता? याबद्दल अधिकची माहिती पोलिस घेत आहेत. सैफ शुद्धीत आल्यानंतर त्याच्याकडून अधिकची माहिती घेण्यात येणार आहे.

Web Title: Sharad Pawar Reaction On Saif Ali Khan Injured In Knife Attack At Mumbai Home Updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.