शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 10:32 IST2025-11-02T10:31:59+5:302025-11-02T10:32:18+5:30
चाहत्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यात पोलिसांनाही नाकीनऊ आले आहे.

शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आज ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. रात्रीपासूनच त्याचे चाहते 'मन्नत' बाहेर जमा झाले आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्याची झलक पाहण्यासाठी आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. तर दुसरीकडे शाहरुख कालपासून अलिबाग येथे आहे. तिथे तो मित्रपरिवारासोबत वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करत आहे.
शाहरुख खानचे जगभरात करोडो चाहते आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक थेट मन्नत बाहेर पोहोचले आहेत. जपान, नेपाळ, बांगलादेश, युकेवरुनही चाहते आले आहेत. 'मन्नत' बाहेर रात्रीपासूनच झगमगाट दिसतोय. कोणी 'हॅपी बर्थडे शाहरुख' म्हणत फक्त ओरडत आहे. तर कोणी त्याची गाणी गात आहे. काही जण हातात शाहरुखसाठी गिफ्ट घेऊन उभे आहेत तर काही पोस्टर घेऊन आहेत. एकूणच मन्नतबाहेर शाहरुखच्या चाहत्यांचा जनसागरच उसळला आहे. चाहत्यांचे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यात पोलिसांनाही नाकीनऊ आले आहे. तसंच वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिस एकाही चाहत्याला मन्नतच्या गेटजवळ उभं राहू देत नाहीयेत.
गेल्या काही महिन्यांपासून शाहरुख दुसऱ्या घरात राहत आहे. कारण मन्नतमध्ये रिनोव्हेशन सुरु आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीच शाहरुखने आपण वाढदिवसाला मन्नत वर येणार अशी हिंट ट्विटरवरुन दिली होती. त्यामुळे कित्येक चाहते आता त्याची झलक पाहण्यासाठी आले आहेत. सध्या शाहरुख अलिबागमध्ये असून आज तो मन्नतमध्ये येणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.