'तेरे नाम'च्या सेटवर सलमान कसा वागायचा? सविता प्रभुणेंचा खुलासा, म्हणाल्या- "स्टारडम म्हणजे काय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:24 IST2025-10-29T13:19:21+5:302025-10-29T13:24:18+5:30
सलमान तेरे नामच्या सेटवर इतरांशी कसा वागायचा, त्याचा स्वभाव कसा होता याविषयी अभिनेत्री सविता प्रभुणेंनी खुलासा केला आहे

'तेरे नाम'च्या सेटवर सलमान कसा वागायचा? सविता प्रभुणेंचा खुलासा, म्हणाल्या- "स्टारडम म्हणजे काय..."
सविता प्रभुणे या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सविता यांना आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय. सविता यांनी गेल्या काही वर्षांतून हिंदी-मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. सविता यांनी सुपरस्टार सलमान खानसोबत 'तेरे नाम' या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमाच्या सेटवर सलमानचा स्वभाव कसा असायचा, याविषयी सविता यांनी मौन सोडलंय.
सविता सलमान खानविषयी काय म्हणाल्या?
सविता प्रभुणेंनी लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ''तेरे नाम सिनेमाचे दिग्दर्शक सतीश कौशिक मला ओळखत होते. ते पण NSD चे खूप सीनियर होते. त्यांनी माझं काम पाहिलं होतं त्यामुळे त्यांनी मला मुद्दाम बोलावून घेतलं. मी त्यावेळी 'कुसुम' नावाची मालिका करत होते. ते मला म्हणाले, तुझं डेली सोप वगैरे बाजूला ठेव आणि आधी माझ्या या फिल्ममध्ये काम कर. त्यावेळी बालाजी टेलिफिल्मसने मला खूप सांभाळून घेतलं. रोज मी सकाळी 'कुसुम'चं शूटिंग करुन या 'तेरे नाम' सिनेमाच्या सेटवर जायची. या चित्रपटाचं शूटिंग इथेच सुरु होतं त्यामुळे मी दोन्ही प्रोजेक्ट एकत्रच करत होते.''
''सलमान खानसोबत खूप छान आठवणी आहेत. हे इतके सर्व मुरलेले कलाकार. त्यामुळे स्टारडम म्हणजे काय असतं, हे मला फार जवळून बघायला मिळालं. हे सगळे जेव्हा सेटवर असतात तेव्हा सगळ्यांशी किती मिळून मिसळून वागतात, ते बघायला मिळालं'', अशाप्रकारे सविता प्रभुणेंनी सलमान खान आणि 'तेरे नाम'च्या सेटवरचा अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. सविता प्रभुणे सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत अभिनय करत आहेत.