कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:17 IST2025-10-25T17:16:34+5:302025-10-25T17:17:01+5:30
सतीश शाह यांची पत्नी कोण? अशी आहे लव्हस्टोरी

कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
सर्वांना खळखळून हसवणारे अभिनेते सतीश शाह यांचं आज निधन झालं. किडनी फेल झाल्याने त्यांचा जीव गेला. गेल्या काही दिवसात बॉलिवूडने अनेक कलाकारांना गमावलं. पंकज धीर, असरानी, पियुष पांडे आणि आता सतीश शाह यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. सतीश शाह यांचं नाव घेतलं की 'साराभाई वर्सेस साराभाई' मालिका आठवते. यात त्यांची रत्ना पाठक शाह यांच्या पतीची इंद्रवर्धन ही भूमिका सर्वांना आजही लक्षात आहेच. तसंच शाहरुख खानच्या 'मै हूँ ना'मध्येही त्यांची प्रोफेसरची भूमिका गाजली. काही दिवसांपूर्वीच पंकज धीर यांच्या निधनाचं कळताच सतीश शाह भावुक झाले होते. त्यांची ट्विटरवर शेवटची पोस्ट काय होती बघा.
सतीश शाह हे ट्विटरवर सक्रीय होते. शम्मी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जुना फोटो शेअर केला होता. गोविंदाच्या 'सँडवीच' सिनेमातला हा फोटो होता. ते त्यांचं शेवटचं ट्वीट ठरलं. तसंच काही दिवसांपूर्वी पंकज धीर यांच्या निधनावरही त्यांनी शोक व्यक्त केला होता.
Happy B’day dearest Shammi ji. You are always around for me. pic.twitter.com/MHRinPl6ul
— satish shah🇮🇳 (@sats45) October 24, 2025
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी?
सतीश शाह यांनी १९७२ साली डिझायनर मधु शाह यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांची भेट एका फिल्म फेस्टिवलमध्ये झाली होती. ते प्रेमात पडले आणि सतीश शाह यांनी लगेच मधु यांना लग्नाची मागणी घातली होती. सुरुवातीला मधु यांनी नकार दिला होता. यामुळे सतीश शाह निराश झाले होते मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांनी पुन्हा प्रपोज केलं आणि पुन्हा नकारच मिळाला. मग तिसऱ्या वेळी मधु यांनी आईवडिलांची परवानगी घ्यायला सांगितली. मगच त्यांचं लग्न झालं. त्यांना मूल नव्हते. पतीच्या निधनानंतर मधु यांना मोठा धक्का बसला आहे.
सतीश शाह आपल्या विनोदी अभिनयासाठी लोकप्रिय होते. २५ जून १९५१ मध्ये त्यांचा जन्म झाला. पुण्यातील एफटीआयआय मधून त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं. ८० दशकापासूनच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. नसीरुद्दीन शाह यांच्या 'जाने दो भी यारो' सिनेमात त्यांनी काम केलं. 'ये जो है जिंदगी' या मालिकेत त्यांनी ५५ एपिसोडमध्ये वेगवेगळ्या ५५ भूमिका केल्या. २००४ साली आलेली त्यांची 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मालिका खूप गाजली. त्यात त्यांची इंद्रवदन साराभाई ही भूमिका होती. सतीश शाह यांनी २०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं. 'हम साथ साथ है', 'कल हो ना हो', 'मै हूँ ना', 'चलते चलते','मुझसे शादी करोगे' अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे.