"संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगाचं शूटिंग करताना..."; संतोष जुवेकरचा अंगावर काटा आणणारा अनुभव
By देवेंद्र जाधव | Updated: January 29, 2025 15:15 IST2025-01-29T15:13:34+5:302025-01-29T15:15:25+5:30
संतोष जुवेकरने 'छावा' सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव सर्वांना सांगितलाय (chaaava, vicky kaushal, santosh juvekar)

"संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगाचं शूटिंग करताना..."; संतोष जुवेकरचा अंगावर काटा आणणारा अनुभव
'छावा' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर अनेक वाद-विवाद झाले. परंतु त्यावर 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिवप्रेमींच्या भावनांचा आदर ठेवत सिनेमातील संभाजी महाराज आणि येसूबाईंच्या लेझीम खेळतानाचा प्रसंग काढून टाकला. 'छावा'मध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे सिनेमात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर रायाजीची भूमिका साकारत. या सिनेमाच्या शूटिंगवेळी संतोषने त्याला आलेला अनुभव सांगितला आहे.
संतोषने सांगितला 'छावा'च्या शूटिंगचा अनुभव
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत संतोष म्हणाला की, "संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सीनवेळेस गाणं संपतं. तो सीन इतका कमाल सेट केलाय की, मी अक्षरशः वेडा झालो. रायगडाचा राज्याभिषेकाचा जो सेट केला होता तो सभामंडप, ते सिंहासन पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. विकीची जेव्हा एन्ट्री होते. हातात धनुष्यबाण, शिवगर्जना आणि राजेंची एन्ट्री होते. आम्ही सर्व त्यांच्यावर फुलं उधळतोय. तेव्हा खरंच डोळ्यात पाणी आलं होतं."
संतोष पुढे म्हणाला की, "विकीला सुद्धा ती भावना जाणवली होती. ते वलय इतकं जबरदस्त आहे की, प्रत्येकाला ते फील झालं. मला असं वाटतं की, ती पॉवर त्या सेटवर होती. जो आदर, जे प्रेम राजांबद्दल आहे ती भावना विकीकडे बघताना आमच्या नजरेत होती. इतकं जबरदस्त होतं सर्व. प्रत्येकजण काम करताना १०० % जीव लावून काम करायचा." विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.