"अरे संजय आलाय, आता हिंदीत..."; मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटायला गेल्यावर काय घडलं? अभिनेते म्हणतात-
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 17:41 IST2025-09-21T17:38:26+5:302025-09-21T17:41:29+5:30
मराठीसाठी आग्रही असणारे राज ठाकरे यांच्या भेटीला संजय मिश्रा गेले. तेव्हा काय घडलं? याचा किस्सा संजय यांनी मुलाखतीत सांगितला आहे

"अरे संजय आलाय, आता हिंदीत..."; मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटायला गेल्यावर काय घडलं? अभिनेते म्हणतात-
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा सध्या 'घाशीराम कोतवाल' या हिंदी नाटकात काम करत आहेत. अभिजीत पानसेंनी हे नाटक दिग्दर्शित केलं आहे. या नाटकात संजय मिश्रांसोबत मराठमोळे कलाकार संतोष जुवेकर, उर्मिला कानेटकर हे झळकत आहेत. अभिजीत पानसे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात कार्यरत आहेत. या नाटकानिमित्ताने संजय मिश्रा हे राज ठाकरेंना भेटायला गेले होते. तेव्हा काय घडलं? जाणून घ्या.
संजय मिश्रा राज ठाकरेंना भेटले तेव्हा काय घडलं?
अभिनेता संजय मिश्रा यांनी ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा एक किस्सा सांगितला आहे. ''मराठी बोललं नाही तर मनसे खळखट्याक करतात, हे तुम्हाला माहित होतं का?'', असा प्रश्न विचारला असता संजय मिश्रा म्हणाले की, ''एकदा राज ठाकरे यांनी मला भेटायला बोलावलं होतं. तेव्हा राज ठाकरे मराठीत बोलत होते, पण मी आल्यानंतर ते सगळ्यांना म्हणाले, "आता संजय आला आहे, इथे आपण हिंदीत बोलूया." अशाप्रकारे राज ठाकरेंच्या खास स्वभावाचं संजय मिश्रांनी वर्णन केलं.
संजय मिश्रा यांनी पुढे सांगितलं की, एका बाजूला मनसे मराठीच्या मुद्द्यावर आग्रही असते, तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंसारखा नेता मराठी नाटक हिंदी रंगमंचावर आणायला मदत करतो, ही गोष्ट खूप चांगली आहे. ते म्हणाले की, अभिजीत पानसे हे मनसेशी संबंधित आहेत हे मला नंतर कळलं, पण मला त्या गोष्टीने काही फरक पडला नाही, कारण ऋतिक घटक हे एक मोठे कम्युनिस्ट दिग्दर्शक असूनही त्यांचं काम मला आवडायचं. अशाप्रकारे संजय मिश्रा यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. 'घाशीराम कोतवाल' हे हिंदी नाटक सध्या हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे.