"गोविंदामुळे संजय दत्तने शिवीगाळ केली, आणि..."; अभिनेता रजत बेदीने सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:58 IST2025-10-09T16:55:53+5:302025-10-09T16:58:22+5:30
संजय दत्तचं रागावरील नियंत्रण सुटलं. त्याने शिवीगाळ केली आणि कारण ठरला गोविंदा. काय घडलं होतं नेमकं?

"गोविंदामुळे संजय दत्तने शिवीगाळ केली, आणि..."; अभिनेता रजत बेदीने सांगितला किस्सा
बॉलिवूडमधील 'जोडी नंबर १' म्हणून एकेकाळी ओळखले जाणारे अभिनेते संजय दत्त आणिगोविंदा यांनी अनेक यशस्वी कॉमेडी चित्रपट दिले. मात्र, या दोन्ही कलाकारांच्या सेटवरील एका मोठ्या वादाचा किस्सा नुकताच समोर आला आहे. अभिनेता रजत बेदीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, गोविंदाच्या उशिरा येण्याच्या सवयीमुळे संजू बाबा इतका संतापला होता की, त्याने सेटवर जाहीरपणे शिवीगाळ केली आणि संपूर्ण सीन बदलून टाकला. काय घडलं होतं नेमकं?
९ तास बघावी लागली गोविंदाची वाट
२००१ साली डेव्हिड धवन दिग्दर्शित 'जोडी नंबर १' या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी ही घटना घडली होती. या चित्रपटात संजय दत्त आणि गोविंदा यांच्यासोबत रजत बेदी देखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. रजत बेदीने आठवण सांगितली की, "डेव्हिड धवन यांना सकाळी ७ वाजता शूटिंग सुरू करायची होती, पण मी आणि संजय दत्त काही कारणास्तव सकाळी ६ वाजताच सेटवर पोहोचलो होतो. संपूर्ण टीम सेटवर हजर होती, पण गोविंदा यांचा पत्ता नव्हता.''
रजत म्हणाला की, गोविंदा हा माणूस म्हणून खूप चांगला आहे, पण त्यांची सेटवर उशिरा येण्याची सवय, ही एक मोठी समस्या होती. सकाळी ७ चा कॉल टाईम असून दुपारचे २ वाजले तरी गोविंदा आले नव्हते.
संजू बाबाने गमावले नियंत्रण
गोविंदांच्या घरी माणूस पाठवूनही तो सेटवर न आल्यामुळे संजय दत्तचा संयम सुटला. रजत बेदी सांगतो की, “दुपारी २ वाजेपर्यंत संजय दत्त पूर्णपणे चिडला होता. त्यांना वाटले की गोविंदा घरी आहेत, तरीही येत नाहीत. पण नंतर कळलं की, ते हैदराबादहून फ्लाईट घेऊन थेट सेटवर येणार आहेत. अखेरीस, गोविंदा दुपारी ३ वाजता सेटवर पोहोचले. गोविंदा आल्यानंतर जेव्हा असिस्टंट डायरेक्टरने संजय दत्तच्या हातात सीनच्या संवादाची स्क्रीप्ट दिली, तेव्हा संजू बाबा अधिकच भडकला.''
संजय दत्तला लक्षात आलं की, या सीनमध्ये त्यांचे डायलॉग्स गोविंदापेक्षा खूप जास्त आहेत. त्यामुळे संजूबाबा संतापला आणि त्यांनी असिस्टंटला थेट शिवीगाळ करायला सुरुवात केली. संजू बाबा ओरडून म्हणाला, "हे डायलॉग गोविंदाला दे. मी हे संवाद बोलणार नाही!"
संजय दत्तचा पारा इतका वाढला होता की, दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना लगेच तो सीन पूर्णपणे बदलावा लागला. या बदललेल्या सीनमध्ये गोविंदा यांना जास्त संवाद देण्यात आले आणि संजय दत्त यांनी कमी संवाद ठेवले. या घटनेनंतर रजत बेदीने गोविंदाचं कौतुक करताना सांगितलं की, इतका वेळ उशीर करूनही जेव्हा गोविंदां यांनी शूटिंग सुरू केली, तेव्हा केवळ दोन तासांत तो संपूर्ण सीन उत्कृष्टपणे त्यांनी पूर्ण केला. तो एक परफॉर्मर आहे," असं म्हणत रजत बेदीने गोविंदाचं कौतुक केलं.