"मी स्क्रीनवर रडतो अन् प्रेक्षक मला पाहून हसतात...", सलमान खानने स्वत:च्याच अभिनयाची केली चेष्टा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 12:51 IST2025-12-14T12:51:06+5:302025-12-14T12:51:39+5:30
सलमान खानने केली आलिया भटची स्तुती

"मी स्क्रीनवर रडतो अन् प्रेक्षक मला पाहून हसतात...", सलमान खानने स्वत:च्याच अभिनयाची केली चेष्टा
अभिनेता सलमान खान नुकताच दुबईतील 'रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल'मध्ये सहभागी झाला होता. त्याच्या स्टायलिश एन्ट्रीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. वयाच्या ६० व्या वर्षी सलमान आपल्या चार्मिंग लूक्सने चाहत्यांना आणखी प्रेमात पाडतो. सलमानचे गेले काही सिनेमे चांगले आपटले. 'सिकंदर'ही फारसा चालला नाही. आता त्याला आगामी 'बॅटल ऑफ गलवान'कडून अपेक्षा आहेत. दरम्यान नुकतंच सलमानने फेस्टिवलमध्ये माध्यमांशी बोलताना स्वत:च्याच अभिनयाची खिल्ली उडवली.
सलमान खान आपल्या प्रसिद्धी, लीगसी आणि हिट्सबद्दल बोलताना स्वत:चीच चेष्टा करतो. रेड सी फेस्टिवलमध्ये तो म्हणाला, "मी स्वत:ला खूप चांगला अभिनेता समजत नाही. या पिढीने अभिनय सोडला आहे. मला नाही वाटत मी खूप कमालीचा अभिनेता आहे. तुम्ही मला काहीही करताना पाहू शकता पण अभिनय नाही. माझ्याकडून अभिनय होतच नाही, मला जे वाटतं तेच मी करतो. कधी कधी तर मी जेव्हा स्क्रीनवर रडत असतो तेव्हा मला वाटतं तुम्ही माझ्यावर हसत असता."
सलमान खानने यावेळी आलिया भटचंही कौतुक केलं. फेस्टिवलमध्ये आलियाला गोल्डन ग्लो हॉरिजन अवॉर्डने सम्मानित करण्यात आलं. सलमान म्हणाला, "आलिया भट शानदार अभिनेत्री आहे. मला वाटतं सौदीच हे करु शकतं. त्यांची आणि आपली संस्कृती ते एकत्र घेऊन येत आहेत हे पाहून छान वाटतंय."
सलमान खानचा 'बॅटल ऑफ गलवान' पुढील वर्षी रिलीज होणार आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या भारत विरुद्ध चीन संघर्षावर सिनेमा आधारित आहे. सलमान यामध्ये आर्मी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. बरेच वर्षांनी तो अशा भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.