"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:11 IST2026-04-07T16:10:39+5:302026-04-07T16:11:35+5:30
एका अवॉर्ड सोहळ्यात राजपाल यादवची खिल्ली उडवली गेली. त्यावरुन सलमानने ही पोस्ट केली आहे.

"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान आपल्या मित्रांसाठी आणि सहकाऱ्यांसाठी नेहमीच खंबीरपणे उभा राहतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका अवॉर्ड सोहळ्यामध्ये अभिनेता राजपाल यादवच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि त्याच्यावर असलेल्या कायदेशीर प्रकरणावर (चेक बाऊन्स केस) भाष्य करत होस्टने त्याची थट्टा केली होती. या प्रकारानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असतानाच, आता सलमान खानने राजपालच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्स आणि संबंधित होस्टला आरसा दाखवला आहे.\
सलमान खानची पोस्ट:
सलमान खानने 'X' (ट्विटर) वर राजपाल यादवसाठी एक भावनिक आणि तितकीच रोखठोक पोस्ट लिहिली आहे. सलमानने म्हटले की, "राजपाल भाई, तुम्ही गेल्या ३० वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करत आहात. आम्ही सगळेच तुम्हाला वारंवार सिनेमात कास्ट करतो. तुमच्या कामाचा दर्जा पाहून तुम्हाला यापुढेही काम मिळतच राहील आणि याच डॉलर रेटवर मिळत राहील. हेच सत्य आहे."
तुमच्या कामाचा दर्जा आणि तुमची किंमत आम्हाला ठाऊक आहे, म्हणूनच आम्ही तुम्हाला वारंवार कास्ट करतो. तुम्हाला भविष्यातही खूप काम मिळेल आणि ते चांगल्या मानधनावरच मिळेल, हेच वास्तव आहे. कधीकधी उत्साहाच्या भरात लोकांच्या तोंडून काही गोष्टी निघून जातात, पण तुम्ही तुमचे काम मनापासून करत राहा. डॉलर वर होवो किंवा खाली काय फरक पडतो?शेवटी व्यवहार तर भारतातच करायचा आहे."
Rajpal bhai aap 30 yrs se kaam kar rahe ho aur hum sabne aapko repeat kiya hai baar baar kyunki aap apna kaam jante ho aur ek value laate ho , kaam toh aapko bohot milega aur issi dollar rate pe milega aur milte rahega . Hakikat yeh hai .
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 7, 2026
Aur yeh yaad rakhna ke kabhi kabhi flow… pic.twitter.com/CzE86CCYXH
नेमकं प्रकरण काय?
रविवारी मुंबईत झालेल्या सोहळ्यातील एका क्लिपमुळे वादाला तोंड फुटले. पुरस्कार सोहळ्याच्या होस्टने राजपाल यादवला उद्देशून टोमणा मारला की, 'राजपाल भाई, डॉलर कितीही वर-खाली झाला तरी, तुम्हाला तेवढेच पैसे परत करावे लागतील जेवढे तुम्ही उधार घेतले आहेत'. या कमेंटवर प्रेक्षकांमध्ये हशा पिकला असला तरी, राजपाल यादवने अत्यंत संयमाने उत्तर दिले. तो हसत म्हणाला, 'अरे, एकदा पूर्ण प्रकरण तर ऐकून घ्या, मला नेमकी अडचण काय आहे ते सांगायचं आहे'. राजपालच्या या हतबलतेचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी होस्टवर जोरदार टीका केली.
सलमान खानने ही पोस्ट करत राजपाल यादवला थेट पाठिंबा दिला असून त्याला बोलणाऱ्या होस्टला चांगलीच चपराक लगावली आहे. राजपाल यादव आगामी 'भूत बंगला' सिनेमात दिसणार आहे. सिनेमात अक्षय कुमार, परेश रावल, असरानी यांच्यासोबत राजपाल यादवचीही स्क्रीनवर धमाल पाहायला मिळणार आहे.