विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 11:23 IST2025-08-29T11:22:22+5:302025-08-29T11:23:14+5:30
विराट कोहलीच्या एका वाक्यावरुन त्यांना 'सैयारा'मधला तो सीन सुचला होता. काय आहे हा किस्सा?

विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
मोहित सुरी (Mohit Suri) दिग्दर्शित 'सैयारा' (Saiyaara) सिनेमाची गेल्या महिनाभर जोरदार चर्चा झाली. अहान पांडे आणि अनीत पड्डा या नवोदित कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने तरुणाईला भुरळ घातली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३२८.५ कोटींची कमाई केली. सिनेमातले अनेक सीन्स, गाणी, डायलॉग्स तरुणाईच्या मनाला भिडले. दरम्यान मोहित सुरींनी नुकताच एक खुलासा केला. विराट कोहलीच्या (Virat Kohli) एका वाक्यावरुन त्यांना 'सैयारा'मधला तो सीन सुचला होता. काय आहे हा किस्सा?
इंडिया टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक मोहित सुरी म्हणाले, "काही वर्षांपूर्वी जेव्हा विराट कोहली त्याचं क्रिकेट करिअर बनवत होता तेव्हा मी त्याला एका नाईट क्लबमध्ये पाहिलं होतं. तिथे तो मित्रांसोबत गप्पा मारताना एक वाक्य बोलला जे मला कायम लक्षात राहिलं. तो म्हणाला,'एक दिवस मी खूप मोठा क्रिकेटपटू बनेन.' त्याच्या बोलण्यात तो आत्मविश्वास होता तो माझ्या कायम लक्षात राहिला. अनेक वर्षांनंतर जेव्हा विराट भारतीय टीममध्ये बेस्ट क्रिकेटर म्हणून उदयास आला तेव्हा मला त्याचं ते वाक्य पुन्हा आठवलं."
ते पुढे म्हणाले, "जर तुम्ही सैयारा पाहिला असेल तर अहान पांडेने साकारलेल्या क्रिश कपूरमध्येही तोच आत्मविश्वास दिसतो जो मला तेव्हा विराट कोहलीमध्ये दिसला होता. क्रिशही सिनेमात म्हणतो की तो एक दिवस संगीत क्षेत्रातला नाव मोठं करेल. विराट कोहलीच्या यशस्वी प्रवासावरुनच प्रेरणा घेऊन मी सिनेमात तो डायलॉग घेतला."
'सैयारा' १८ जुलै रोजी रिलीज झाला. आता एक महिन्यांनंतर सिनेमा ओटीटीवर येणार आहे. नेटफ्लिक्सवर सिनेमा रिलीज केला जाणार आहे. सिनेमामुळे अहान आणि अनीत स्टार झाले आहेत. त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.