Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:41 IST2025-10-09T12:41:19+5:302025-10-09T12:41:49+5:30
Saif Ali Khan Knife Attack: सैफ अली खानवर काही महिन्यांपूर्वी घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला. आता तब्बल ८ महिन्यांनी पहिल्यांदाच, सैफने त्या रात्री नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे सांगितलं आहे.

Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
अभिनेता सैफ अली खानवर काही महिन्यांपूर्वी घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला. यामध्ये सैफच्या मानेवर आणि पाठीवर जखमा झाल्या. सुदैवाने अभिनेता यातून लवकर बरा झाला. आता तब्बल ८ महिन्यांनी पहिल्यांदाच, सैफने त्या रात्री नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे सांगितलं आहे. ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या "टू मच" या शोमध्ये सैफ सहभागी झाला होता.
सैफन सांगितलं की, "त्या रात्री करिना बाहेर गेली होती आणि मी मुलांसोबत (तैमूर आणि जेह) चित्रपट पाहून परत आलो होतो. आम्ही पहाटे २ वाजता झोपायला गेलो. करिना परत आली तेव्हा आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि नंतर पुन्हा झोपी गेलो. मग मोलकरीण आत आली आणि म्हणाली, जेहच्या खोलीत कोणीतरी आहे. त्याच्या हातात चाकू आहे आणि त्याला पैसे हवेत असं म्हणत आहे.'"
"जेह आणि नॅनी दोघांनाही किरकोळ दुखापत"
"मी हे ऐकले आणि लगेच बेडवरून उठलो. मी जेहच्या खोलीत गेलो - अंधार होता आणि मला बेडवर एक माणूस चाकू घेऊन उभा असलेला दिसला." अक्षय कुमारने विचारलं, "तो मुलाकडे चाकू दाखवत होता का?" सैफ म्हणाला, "तो इतका हालचाल करत होता की, जेह आणि नॅनी दोघांनाही किरकोळ दुखापत झाली. मला वाटलं, तो माझ्यापेक्षा बारीक आहे, मी त्याला हाताळू शकतो. म्हणून मी त्याच्यावर उडी मारली. पण हल्लेखोर चिडला. त्याच्याकडे दोन चाकू होते आणि तो सर्वत्र वार करू लागला."
"माझ्या पाठीवर जोरदार वार"
"मी माझं ट्रेनिंग आठवण्याचा प्रयत्न केला आणि काही हल्ले रोखले. पण नंतर माझ्या पाठीवर जोरदार वार केला. तोपर्यंत घरातील इतर लोक बाहेर आले होते. आमची मोलकरीण गीता मदतीला आली आणि हल्लेखोराला माझ्यापासून वेगळे केलं. तिने माझा जीव वाचवला, कारण तोपर्यंत मी जखमी झालो होतो. त्यानंतर आम्ही त्याला एका खोलीत बंद केलं."
"मी दुखापतींमुळे खूप थकलो"
"मी डायनिंग रुममध्ये खोलीत ठेवलेली तलवार उचलली, पण मी दुखापतींमुळे खूप थकलो होतो. माझ्या पाठीच्या कण्यालाही जखम झाली होती. करीनाने ताबडतोब रुग्णालयात जाण्यास सांगितलं. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेला होता. यानंतर करिना मुलांना लोलो (करिश्मा कपूर) च्या घरी घेऊन जाणार होती. पण तैमूरला माझ्यासोबत यायचं होतं" असं अभिनेत्याने म्हटलं आहे.