'कबीर सिंह'मधलं 'बेख्याली' गाणं माझं- अमाल मलिकचा दावा; ओरिजनल संगीतकार सचेत परंपरा संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 18:21 IST2025-12-10T18:20:15+5:302025-12-10T18:21:08+5:30
सार्वजनिकरित्या माफी माग.., सचेत परंपराचा अमाल मलिकला इशारा

'कबीर सिंह'मधलं 'बेख्याली' गाणं माझं- अमाल मलिकचा दावा; ओरिजनल संगीतकार सचेत परंपरा संतापले
बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी सचेत परंपरा यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. शाहिद कपूरच्या 'कबीर सिंह' सिनेमासाठी त्यांनी गाणी गायली होती. त्यातलं 'बेखयाली' गाणं पुन्हा चर्चेत आलं आहे. या गाण्याबद्दलचा एक वाद पुन्हा सुरु झाला आहे. नुकताच बिग बॉस १९ मध्ये दिसलेला संगीतकार अमाल मलिकने 'बेखयाली' गाणं माझं असल्याचा दावा केला. त्यावर आता सचेत परंपरा यांनी व्हिडीओ शेअर करत रोखठोक उत्तर दिलं आहे. यासोबतच दोघांनी अमालसोबतचं जुनं चॅटही दाखवलं आहे.
अमाल मलिकच्या दाव्यानंतर सचेत-परंपरा भडकले आहेत. व्हिडीओ शेअर करत ते म्हणाले, "आम्ही हा व्हिडीओ एका गंभीर विषयावर बनवत आहोत. अमाल मलिकबद्दल आम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. अशा प्रकारे आम्हाला सगळं सांगावं लागेल हे वाटलं नव्हतं. बेख्याली गाणं हे प्युअरली आम्ही तयार केलं होतं. काही दिवसांपूर्वी अमाल मलिकने दावा केला की हे त्याचं गाणं आहे. किंवा तो असं म्हणतोय की दिग्दर्शकाने त्याला येऊन सांगितलं की तुझं गाणं तर कॉपी झालं आहे. हे सगळं खोटं आहे.
"अमाल मलिकसोबतचे चॅट्स आमच्याकडे आहेत. कबीर सिंह टीमसोबतचे चॅट्सही आहेत. उलट हे गाणं तयार होत होतं तेव्हा कबीर सिंहची संपूर्ण टीम हजर होती. त्यांच्यासमोरच गाण्याची प्रत्येक मेलडी, कॉम्पोजिशन, प्रत्येक शब्द याची प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे हे प्युअरली सचेत परंपरा कंपोझिशन आहे. अमाल असंही म्हणतोय की कोणी कोणाचे फेवरेट होतात पण आम्ही तर कबीर सिंह आधी कधीच टीसीरिज सोबतही कधीच नव्हतो. उलट तोच २०१५ पासून टीसीरिजसोबत आहे. "
"अमाल मलिक म्हणतो की त्याचं गाणं कोणीतरी आम्हाला व्हॉट्सअॅपवर पाठवलं वगैरे...आम्ही आउटसायडर आहोत. आम्हाला कोणी का फेवर करेल? जर आम्ही तुझं गाणं चोरलं असं तू म्हणतोय तर तू रिलीजनंतर आम्हाला अभिनंदनाचा मेसेज का करतो? आमच्याकडे तुझा नंबरही नव्हता. तूच आमचं अभिनंदन केलं आणि नवीन गाण्यांविषयी विचारलं. असं सगळं असताना तू म्हणतो की आम्ही तुझं गाणं चोरलं. तुला हे सगळं करण्याची काय गरज पडली आहे?"