"राजामौलींनी संपर्कच केलेला नाही", दादासाहेब फाळकेंच्या कुटुंबाचा खुलासा; हिरानींवर विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:45 IST2025-05-19T15:41:44+5:302025-05-19T15:45:48+5:30
राजकुमार हिरानी अन् आमिर खानवर दादासाहेब फाळकेंच्या कुटुंबाने दाखवला विश्वास

"राजामौलींनी संपर्कच केलेला नाही", दादासाहेब फाळकेंच्या कुटुंबाचा खुलासा; हिरानींवर विश्वास
भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच येणार आहे. विशेष म्हणजे दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस. राजामौली (S S Rajamouli) ज्युनिअर एन.टी.आरला घेऊन हा सिनेमा बनवत आहेत. तर दुसरीकडे राजकुमार हिरानींनी (Rajkumar Hirani) आमिर खानला (Aamir Khan) घेऊन याच सिनेमाची घोषणा केली आहे. याचा अर्थ दादासाहेब फाळकेंवर येत्या काळात दोन सिनेमे येणार आहेत. दरम्यान दादासाहेब फाळकेंच्या नातवाने हिरानी -आमिरवर विश्वास दाखवला आहे. तर राजामौलींनी अद्याप त्यांच्याशी कोणताही संपर्क न केल्याचा खुलासा केला आहे.
राजामौली यांना २०२३ सालीच दादासाहेब फाळकेंच्या जीवनावर आधारित सिनेमाची घोषणा केली होती. तर राजकुमार हिरानींनी यावर्षी १५ मे रोजी सिनेमाची घोषणा केली. दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर श्रीकृष्ण पुसळकर अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "राजामौली सिनेमा बनवत आहेत असं मी ऐकलं. पण त्यांनी आमच्याशी अद्याप संपर्क केलेला नाही. जर फाळके सरांवर कोणी सिनेमा आणत असेल तर त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधायला नको का? याकडे कसं काय दुर्लक्ष केलं जाऊ शकतं? फाळके सरांवर खऱ्या आणि कधीही न ऐकलेल्या गोष्टी आम्ही नाही तर आणखी कोण सांगणार?"
आमिर खान आणि राजू हिरानींबद्दल ते म्हणाले, "त्या दोघांनी आमचा विश्वास जिंकला आहे. त्यांनी यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. यासाठी बराच वेळ दिला आहे. हिरानी देखील सिनेमा करत आहेत हे माझ्यासाठी सरप्राईज होतं. दोघं मिळून यावर काम करत आहेत असं मी ऐकलं. मात्र यासंदर्भात असिस्टंट प्रोड्युसर हिंदुकुश भारद्वाज गेल्या तीन वर्षांपासून सतत माझ्या संपर्कात आहेत. माझ्याकडून माहिती घ्यायचे, संशोधन करायचे. त्यांची मेहनत पाहून मी त्यांना म्हणालो की तुम्ही अगदी मनापासून काम करत आहात. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे."
पुसळकर यांनी सिनेमासाठी अभिनेत्रीचं नावही सुचवलं. दादासाहेब फाळके यांची पत्नी सरस्वतीबाई फाळके यांच्या भूमिकेत त्यांनी विद्या बालनचं नाव सुचवलं.