सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला दिलासा, कोर्टाचा मोठा निर्णय; बँक अकाउंट्स डीफ्रीज करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 12:49 IST2026-04-26T12:43:59+5:302026-04-26T12:49:51+5:30
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला दिलासा, कोर्टाचा मोठा निर्णय; बँक अकाउंट्स डीफ्रीज करण्याचे आदेश
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती अडकले होते. रियाला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती आणि तिला २८ दिवस तुरुंगात राहावे लागले होते. रिया आणि शोविकची बँक खाती गोठवण्यात आली होती. आता या प्रकरणात विशेष एनडीपीएस (NDPS) न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
गेल्या ६ वर्षांपासून गोठवण्यात आलेली त्यांची बँक खाती पुन्हा सुरू करण्याचे आदेश शनिवारी न्यायालयाने दिले आहेत. रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, बँक खाती गोठवताना कायदेशीर प्रक्रियेचे योग्य पालन केले गेले नाही. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला. न्यायालयाने स्पष्ट केले की, कायद्यानुसार मालमत्ता जप्त करण्याचा कोणताही आदेश ३० दिवसांच्या आत सक्षम प्राधिकरणाकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. या प्रकरणात तसे झाले नसल्याने खाती गोठवण्याची कारवाई बेकायदेशीर ठरते.
दरम्यान रीया अनेक वर्ष रिया एनसीबीच्या चौकशी फेऱ्यात होती. गेल्या वर्षी या प्रकरणात रियाची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर, आता बँक खाती पुन्हा सुरू होणे हा तिच्यासाठी कायदेशीर लढाईतील दुसरा मोठा विजय मानला जात आहे. या निर्णयामुळे रिया आणि तिच्या कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, गेल्या सहा वर्षांपासून रखडलेले त्यांचे आर्थिक व्यवहार आता पुन्हा सुरू होऊ शकणार आहेत.