शाहरुखचे पांढरे केस पाहून सेटवर हसली होती राणी मुखर्जी; दिग्दर्शकांनी केली कानउघडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 16:02 IST2023-11-21T16:01:06+5:302023-11-21T16:02:02+5:30
Rani mukherjee: एका टॉक शोमध्ये राणी मुखर्जीने या गोष्टीचा खुलासा केला.

शाहरुखचे पांढरे केस पाहून सेटवर हसली होती राणी मुखर्जी; दिग्दर्शकांनी केली कानउघडणी
अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि राणी मुखर्जी (Rani mukherjee) या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे या जोडीची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावते. परंतु, वीर-जारा (Veer Zaara) या सिनेमात पहिल्यांदा ही जोडी कपल म्हणून नाही तर एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर आले. त्यांचा हा अंदाजही प्रेक्षकांना आवडला होता. परंतु, या सिनेमाच्या सेटवर एक किस्सा घडला होता. ज्यामुळे राणी मुखर्जीला दिग्दर्शक सगळ्यांसमोर ओरडले होते.
'वीर जारा' या सिनेमात शाहरुखने एका इंडियन एयरफोर्स पायलटची भूमिका साकारली होती. तर राणीने एका पाकिस्तानी वकिलाची. सिनेमाच्या उत्तरार्धात शाहरुख एका वयस्क इंडियन एयरफोर्स पायलटच्या रुपात दिसून येतो. या भूमिकेसाठी त्याने वृद्धांसारखा मेकअप केला होता. चेहऱ्यावर सुरकुत्या, पांढरे केस असा त्याचा एकंदरीत गेटअप होता. परंतु, त्याचा हा लूक पाहून राणीला प्रचंड हसू आलं.
राणी आणि शाहरुखच्या एका सीनचं शूट सुरु होतं. यावेळी शाहरुखकडे पाहिल्यावर तिला सतत हसू येत होतं. त्यामुळे तिला दिग्दर्शकांनी चांगलं सुनावलं. एका टॉक शोमध्ये तिने याविषयीचा खुलासा केला. "मी शाहरुखसोबत कायम रोमॅण्टिक सीन दिले आहेत. त्यामुळे त्याला एका वयस्क व्यक्तीच्या रुपात समोर पाहिल्यावर मला हसू येत होतं. मला हसताना पाहून शाहरुख सुद्धा हसायचा. आमच्या या मस्तीमुळे शुटिंग वारंवार थांबत होतं. शेवटी यश चोप्रा यांनी आम्हाला सिरीअसली सीन करायची तंबी दिली. तेव्हा कुठे आम्ही तो सीन पूर्ण केला", असं राणी म्हणाली.