'ब्रह्मास्त्र २' कधी येणार? रणबीर कपूरने दिलं उत्तर; म्हणाला, "हा प्रोजेक्ट अयान मुखर्जीचा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 15:23 IST2025-03-13T15:23:13+5:302025-03-13T15:23:36+5:30
अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र २' चं पुढे काय झालं?

'ब्रह्मास्त्र २' कधी येणार? रणबीर कपूरने दिलं उत्तर; म्हणाला, "हा प्रोजेक्ट अयान मुखर्जीचा..."
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या बॉलिवूडमध्ये एकदम अॅक्टिव्ह आहे. 'अॅनिमल' च्या यशानंतर त्याची लोकप्रियता वाढली आहे. अनेक दिग्दर्शक, निर्माते त्याच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या तो आगामी 'रामायण' आणि संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. याशिवाय 'अॅनिमल पार्क' सिनेमाही नंतर करणार आहे. दरम्यान २०२२ साली आलेल्या 'ब्रह्मास्त्र' चा सीक्वेल कधी येणार असा प्रश्न चाहते विचारत असतात. यावर नुकतंच रणबीरने अपडेट दिलं आहे.
अभिनेत्री आलिया भटने नुकतंच पापाराझींसोबत प्री बर्थडे सेलिब्रेट केला. आलियाचा वाढदिवस १५ मार्च रोजी असतो. मात्र आजच तिने रणबीरसोबत मिळून पापाराझींसोबत केक कट करत वाढदिवस साजरा केला. यावेळी दोघांनी पापाराझींशी गप्पाही मारल्या. यावेळी रणबीरला 'ब्रह्मास्त्र'च्या सीक्वेलबाबत विचारण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला, "ब्रह्मास्त्र हे अनेक वर्षांपासूनचं अयानचं स्वप्न आहे. सध्या तो वॉर २ च्या दिग्दर्शनात व्यस्त आहे हे सर्वांनाच माहित आहे. एकदा का तो सिनेमा रिलीज झाला की तो ब्रह्मास्त्र २ च्या प्री प्रोडक्शनचं काम सुरु करेल. पण सिनेमाचा सीक्वेल नक्कीच होणार यात शंका नाही. अद्याप याबाबत आम्ही काही घोषणा करु शकत नाही. पण लवकरच यासंदर्भात पुढच्या घोषणा होतील."
याशिवाय लव्ह अँड वॉरबद्दल तो म्हणाला, "मी १७ वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळींसोबत काम केलं होतं. पुन्हा त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय याचा आनंद आहे. मी इतक्या मेहनती माणसाला भेटलो नव्हतो. ज्यांना भूमिका, भावना, संगीत, भारतीय संस्कृती सगळ्याचीच त्यांना जाण आहे. त्यांच्या सेटवर बरेच तास काम करावं लागतं जे थकवा आणणारं असतं. पण त्यांचं कलेवर असलेलं प्रेम आपल्याकडून ते करवून घेतं. त्यामुळे कलाकार म्हणून त्यांच्यासोबत काम करताना वेगळी मजा येते."