"मदतीचा आदर आहे, पण मला तुमची..."; सलमान-अजय देवगणने केलेल्या आर्थिक मदतीविषयी राजपाल यादवची टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:20 IST2026-02-20T13:18:22+5:302026-02-20T13:20:15+5:30
राजपाल यादव सध्या चेक बाउंस आणि कर्ज प्रकरणामुळे चर्चेत आहे. ९ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणी तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर राजपालने चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून मिळालेल्या मदतीवर मौन सोडले आहे.

"मदतीचा आदर आहे, पण मला तुमची..."; सलमान-अजय देवगणने केलेल्या आर्थिक मदतीविषयी राजपाल यादवची टिप्पणी
बॉलिवूडचा प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या चेक बाउंस आणि कर्ज प्रकरणामुळे चर्चेत आहे. ९ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणी तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर राजपालने चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून मिळालेल्या मदतीवर मौन सोडले आहे. कलाकार म्हणून राजपाल यादवने जपलेला स्वाभिमान आणि त्याच्या मनातील भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.
सलमान, अजय आणि अक्षयची मदत?
राजपाल यादव अडचणीत असताना सलमान खान, अजय देवगण, सोनू सूद यांसारख्या बड्या स्टार्सनी त्याला आर्थिक मदत केल्याची चर्चा रंगली होती. यावर बोलताना राजपाल म्हणाला, "मी मिळालेल्या प्रत्येक मदतीचा आदर करतो, पण मला लोकांकडून सहानुभूती नको आहे. मला जे काम मिळत आहे, त्यामुळेच हेच सिद्ध होतंय की लोक माझ्या पाठीशी आहेत."
"मी फ्रॉड असतो तर काम मिळाले असते का?"
पुढे राजपाल म्हणाला, "२०१२ मध्ये जेव्हा हे प्रकरण समोर आले, तेव्हा मला 'फ्रॉड' म्हटले गेले. पण तेव्हापासून आजपर्यंत मला दरवर्षी किमान १० चित्रपट मिळत आहेत. जर मी खरंच फसवणूक केली असती, तर इंडस्ट्रीत कोणी माझ्यासोबत काम का केले असते? चित्रपटसृष्टी माझ्या पाठीशी आहे हे सिद्ध करण्यासाठी मला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही."
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव पुन्हा एकदा आयुष्यात सक्रीय झाला आहे. नुकताच त्याचा एका लग्नसमारंभातील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या कायदेशीर लढाईनंतरही राजपालच्या कामातील उत्साह कमी झालेला नाही, हेच यातून दिसून येते.
नेमके प्रकरण काय?
२०१० मध्ये राजपाल यादवने 'अता पता लापता' या स्वतःच्या दिग्दर्शित चित्रपटासाठी ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे तो हे कर्ज फेडू शकला नाही. व्याजासह ही रक्कम ९ कोटींवर पोहोचली. या प्रकरणी चेक बाउंस झाल्याने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी राजपालने न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. आता अडीच कोटी रुपये जमा केल्यानंतर त्याला अंतरिम जामीन मिळाला आहे.