नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना, अभिनेता रजनीकांत म्हणाले, "तमिळ समाजाचा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 13:43 IST2023-05-28T13:42:05+5:302023-05-28T13:43:21+5:30
संसद भवनात राजदंडाची स्थापना केल्यानंतर रजनीकांत, कमल हसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना, अभिनेता रजनीकांत म्हणाले, "तमिळ समाजाचा..."
संसद भवनाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज दिल्लीत पार पडला. पारंपारिक पद्धतीने विधी आणि मंत्रोच्चारांसह नव्य संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. आता या सोहळ्यावर मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant), कमल हसन (Kamal Hassan) यांनी देखील नवीन संसद भवनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) हवन केल्यानंतर ५००० वर्ष जुन्या राजदंडाची म्हणजेच सेंगोलची पूजा केली. पीएम मोदींनी राजदंडाला साष्टांग नमस्कार केला. यासोबतच त्यांनी उपस्थित साधूसंताचे आशीर्वादही घेतले. यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सभापतींच्या खुर्चीजवळ सेंगोल स्थापित केला आहे. सेंगोलला अनन्यसाधारण महत्व आहे. सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून सेंगोलकडे पाहिलं जातं. नवीन संसद भवनात सेंगोलची स्थापना केल्याने अभिनेते रजनीकांत आनंदित झाले आहेत.
रजनीकांत ट्वीट करत म्हणाले, "तमिळ सत्तेचं पारंपारिक प्रतीक असलेला राजदंड संसदेच्या नव्या इमारतीत शोभून दिसेल. तमिळ समाजाचा आणि आमच्या संस्कृतीचा सम्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खूप खूप आभार.."
याशिवाय अभिनेते कमल हसन यांनी मोदींच्या या कृतीचं कौतुक करत विरोधकांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, "भारताचं नवं संसद भवन हे घर आहे आणि इथे सर्वांनी उपस्थित असणं गरजेचं आहे. माझा लोकतंत्रावर विश्वास आहे त्यामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार घालणाऱ्यांनी पुन्हा एकदा विचार करावा. या कार्यक्रमाबद्दल असलेले मतभेद हे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडले जाऊ शकतात. नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज संपूर्ण जगभरातील लोकांचे लक्ष आपल्याकडे असेल. आपले राजकीय मतभेद एका दिवसासाठी बाजूला ठेवत, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रीय एकात्मता दाखवू या.”