भ्रष्टाचाराबाबत स्पष्टच बोलला रितेश देशमुख, सांगितलं नेमकं कुठून होते सुरुवात ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:50 IST2025-04-29T13:49:27+5:302025-04-29T13:50:28+5:30
नुकतंच रितेश देशमुखनं भ्रष्टाचाराबाबत स्पष्ट मत मांडलं. यासोबत त्याने खऱ्या आयुष्यात कधी भ्रष्टाचार होताना पाहिला आहे का? याबद्दलही सांगितलं.

भ्रष्टाचाराबाबत स्पष्टच बोलला रितेश देशमुख, सांगितलं नेमकं कुठून होते सुरुवात ?
Riteish Deshmukh Talks Corruption: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये एका सिनेमाची चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे 'रेड २'. २०१८ मध्ये बॉक्स ऑफिसवर धाड टाकून धुमाकूळ घालणारा अमय पटनायक आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पहिल्या भागाप्रमाणेच 'रेड २' ची कथाही भ्रष्टाचार आणि करचुकवेगिरीविरुद्धच्या एका आयकर अधिकाऱ्याच्या लढ्यावर आधारित आहे. 'रेड २'मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) अभिनयाची खास जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. अजय देवगण नायक असला तरी त्याच्या तोडीस तोड असा रितेश हा दादा मनोहर भाई या खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट १ मेला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सध्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नुकतंच रितेश देशमुखभ्रष्टाचाराबाबत स्पष्ट मत मांडलं. यासोबत त्याने खऱ्या आयुष्यात कधी भ्रष्टाचार होताना पाहिला आहे का? याबद्दलही सांगितलं.
रितेश देशमुखनं नुकतंच 'फिल्मीज्ञान'शी बोलताना खऱ्या आयुष्यात मी कधीच भ्रष्टाचाराचा सामना केला नसल्याचं सांगितलं. भ्रष्टाचाराची सुरुवात नेमकी कुठून होते? याबद्दल रितेश म्हणाला, "जेव्हा पालक हे मुलांना म्हणतात की बाळा, तू जर परीक्षेत चांगले मार्क्स मिळवलेस, तर मी तुला बॅट घेऊन देईन. तू अमुक एखादी गोष्ट केलीस, तर मी तुला चार चॉकलेट देईन. त्यामुळे आपण जरी भ्रष्टाचार करीत नसलो, तरी मुळापर्यंत गेल्यास लक्षात येत की येथूनच त्याची सुरुवात येथून होत असते. जर तुम्ही माझ्यासाठी एखादी गोष्ट केली, तर मी तुमच्यासाठी एखादी गोष्ट करेन, ही देवाण-घेवाण मोठ्या स्तरावर घेऊन गेल्यास ती भ्रष्टाचाराच्या रूपात मोठ्या प्रमाणात पसरते", असं त्यानं म्हटलं.
रितेशच्या मते भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी सर्वांत मोठी शक्ती ही "नाही" म्हणणे ही आहे. "नाही" असं म्हणूनच आपण भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देऊ शकतो. याच मुलाखतीमध्ये जेव्हा रितेशला विचारलं की तुझ्या मते भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी सर्वांत मोठी शक्ती कोणती? यावर रितेश म्हणाला, "नाही म्हणा". दरम्यान, 'रेड २'मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख या दोघांशिवाय सिनेमात वाणी कपूर, सौरभ शुक्ला हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. सर्वांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे. 'रेड'चा पहिला भाग यशस्वी झाला होता. त्यामुळे 'रेड २' ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे सिनेमा रिलीज झाल्यावर कळून येईलच.