"मी १२ तासच काम करणार...", दीपिकानंतर आता राधिका आपटेनेही ठेवली अट; कारणही सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 14:00 IST2025-12-18T13:59:37+5:302025-12-18T14:00:21+5:30
दीपिकाच्या आठ तासांच्या मुद्द्यानंतर आता राधिकाचीही मागणी

"मी १२ तासच काम करणार...", दीपिकानंतर आता राधिका आपटेनेही ठेवली अट; कारणही सांगितलं
सध्या मनोरंजनविश्वात कामाच्या तासांवरुन मोठा वाद सुरु आहे. अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोणमुळे या मुद्द्याला सुरुवात झाली. तिने आई झाल्यानंतर आठ तासच काम करणार अशी अट ठेवली. यामुळे तिला साउथच्या दोन बिग बजेट सिनेमांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तर आता न्यू मॉम अभिनेत्री राधिका आपटेनेही यावर मत मांडलं आहे.
राधिका आपटेने काही दिवसांपूर्वीच लेकीचा पहिला वाढदिवस साजरा केला. कामाच्या तासांवरुन आता किमान चर्चा तरी होत आहे यावर राधिकाने आनंद व्यक्त केला आहे. राधिका म्हणाली, "मी १२ तासांच्या शिफ्टची अट ठेवली आहे. निर्मात्यांना जर हे मान्य असेल तरच मी आता त्यांच्यासोबत काम करेन. प्रवास, मेकअप-हेअर हे त्या १२ तासांमध्येच येईल. नाहीतर असं तर आम्ही १६ तास काम करत होतो. प्रत्यक्ष सेटवर १४ तास आणि प्रवास, हेअर-मेकअप धरलं तर १६ तास होता. तुम्ही आपल्या मुलीशिवाय १६ तास कसं राहाल? या कामात वीक ऑफही नसतो. कधी कधी लंच ब्रेकही नसतो. त्यामुळे मला अशा पद्धतीने काम करताच येणार नाही. बरेच लोक ही अट मान्य करणार नाही त्यामुळे अनेक प्रोजेक्ट्सला मुकावं लागणार आहे. जे मान्य करतील त्यांच्यावरच अवलंबून आहे."
राधिका 'साली मोहोब्बत' सिनेमात दिसत आहे. सध्या ती सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात आली आहे. याबद्दल ती म्हणाली, "मी पहिल्यांदाच मुलीला सोडून राहत आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे कठीण आहे. तिचं बाबासोबत छान नातं आहे आणि आम्ही दोघंही आमची कामं वाटून घेतली आहेत. आमच्या घरी नॅनी किंवा कोणी मदतनीसही नसते. त्यामुळे ती आमच्या दोघांशी खूप अॅटॅच्ड आहे. तिचं खरं तर मस्त चालुए. मलाच चिंता वाटत होती पण मला हा वेळ मिळाला याबद्दलही आनंद आहे. मी मस्त झोप काढली. उशिरा उठले. मला हे स्वातंत्र्य आवडलं."