'धुरंधर २'मध्ये आर.माधवनची भूमिका करणार 'हे' महत्वाचं काम; अभिनेता म्हणाला- "मी रणवीर सिंगला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:07 IST2025-12-10T11:06:08+5:302025-12-10T11:07:07+5:30
आर. माधवन 'धुरंधर २'मध्ये काय करणार? त्याचं आणि रणवीर सिंगचं काय संबंध आहेत? याविषयी अभिनेत्याने सविस्तर खुलासा केला आहे

'धुरंधर २'मध्ये आर.माधवनची भूमिका करणार 'हे' महत्वाचं काम; अभिनेता म्हणाला- "मी रणवीर सिंगला..."
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या अॅक्शन-स्पाय चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. रणवीर सिंगसह अनेक मोठ्या कलाकारांनी या चित्रपटात आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे. या चित्रपटात इंटेलिजन्स ब्युरोचे (IB) डायरेक्टर अजय सन्याल ही महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता आर. माधवनने आता या चित्रपटाच्या सिक्वलबद्दल म्हणजेच 'धुरंधर २' (Dhurandhar 2) मधील आपल्या भूमिकेबाबत एक मोठे अपडेट दिले आहेत.
'धुरंधर' चित्रपटामध्ये माधवनचा स्क्रीन टाइम कमी होता, पण त्याच्या भूमिकेने कथानकात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आता, 'धुरंधर २' मध्ये माधवनची भूमिका अधिक मोठी आणि महत्त्वपूर्ण असणार आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत माधवनने सांगितले की, 'धुरंधर'च्या सिक्वलमध्ये अजय सन्याल रणवीर सिंगने साकारलेल्या मुख्य पात्राला स्पाय एजंट बनण्याचे ट्रेनिंग देताना दिसतील. यामुळे 'धुरंधर २' मध्ये आर. माधवनचे योगदान खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
आदित्य धरचं कौतुक
यावेळी आर. माधवनने चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरचेही कौतुक केले. ते म्हणाले की, आदित्य धर साधूसारखे आहेत आणि इतका गहन चित्रपट बनवत असतानाही ते आपल्या भावना आणि मनातील अस्वस्थपणावर चांगले नियंत्रण ठेवू शकतात. माधवनने आदित्य धरसोबत पुन्हा पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
'धुरंधर 2' कधी रिलीज होणार?
आदित्य धरचा 'धुरंधर' चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून तो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाच्या शेवटीच निर्मात्यांनी 'धुरंधर २'ची घोषणा केली होती. या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये सिक्वलबद्दल खूप उत्सुकता आहे. हा सिक्वल पुढील वर्षी १९ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.