"साऊथ इंडस्ट्री परंपरांना धरुन असते तर बॉलिवूड...", आर. माधवन स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:47 IST2025-01-20T12:46:34+5:302025-01-20T12:47:58+5:30
हिंदी आणि साऊथ अशा दोन्ही इंडस्ट्रीत काम करताना काय फरक जाणवतो यावर नुकतंच माधवनने उत्तर दिलं आहे.

"साऊथ इंडस्ट्री परंपरांना धरुन असते तर बॉलिवूड...", आर. माधवन स्पष्टच बोलला
'रहना है तेरे दिल मे', 'तनू वेड्स मनू' या सिनेमांमधून तरुणांना प्रेमात पाडणारा अभिनेता आर माधवन (R Madhavan). त्याच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं. साऊथमधील अनेक भाषांमध्ये त्याने काम केलं आहे. तसंच बॉलिवूडमध्येही त्याचं वेगळं स्थान आहे. दरम्यान हिंदी आणि साऊथ अशा दोन्ही इंडस्ट्रीत काम करताना काय फरक जाणवतो यावर नुकतंच माधवनने उत्तर दिलं आहे.
'न्यूज १८ शोशा'ला दिलेल्या मुलाखतीत आर माधवन म्हणाला, "हिंदी, तेलुगू किंवा मल्याळम कोणतीही इंडस्ट्री असो त्या त्या नुसार तिथल्या परिभाषा या बदलतातच. बॉलिवूड खूप जास्त Elitist(श्रेष्ठ) झाला आहे जेव्हा की तेलुगु फिल्म इंडस्ट्री अजूनही आपल्या मूळाशी घट्ट बांधलेली आहे. त्यांच्या सिनेमांमध्ये परंपरांची झलक दिसते. एस एस राजामौली यांच्या सिनेमांचंच उदाहरण घ्या. त्यांचेही सिनेमे जमिनीशी जोडलेले असतात. भारतातील छोट्या शहरांच्या इतिहासाची यात झलक दिसते. ते बाहुबली, आरआरआर किंवा पुष्पा सारखे सिनेमे बनवण्यासाठी खूप पैसे लावतात. या गोष्टींच्या चित्रीकरणासाठी आणि त्यांना मजबूत बनवण्यासाठी आपला जीव झोकून काम करतात."
मल्याशम इंडस्ट्रीबद्दल मॅडी म्हणाला, "गेल्या काही वर्षात मल्याळम इंडस्ट्री खूप पुढे गेली आहे. कंटेंट आणि भूमिकांवर फोकस करण्यात इंडस्ट्री यशस्वी ठरली आहे. मर्यादित बजेटचेही सिनेमे कमाल प्रदर्शन करत आहेत. तेलुगूमध्ये तरी बिग बजेट सिनेमे यातात जे फ्लॉप होतात ही देखील एक वास्तविकता आहे. इंडस्ट्रीत सध्या बरेच कायापालट होत आहेत. लवकरच नवीन कंटेंट आणि वेगळं काहीतरी पाहून प्रेक्षकही अवाक होतील."