"बरंच झालं हेमा मालिनी आल्या नाहीत...", धर्मेंद्र यांच्या प्रेयर मीटनंतर प्रसिद्ध निर्मात्याचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:30 IST2025-12-18T11:26:26+5:302025-12-18T11:30:10+5:30
काहीही वाद न होता..., हेमा मालिनीबद्दल काय म्हणाले निर्माते?

"बरंच झालं हेमा मालिनी आल्या नाहीत...", धर्मेंद्र यांच्या प्रेयर मीटनंतर प्रसिद्ध निर्मात्याचं वक्तव्य
बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. धर्मेंद्र यांच्या आठवणीत अख्खा देश हळहळला. त्यांचं कुटुंब अजूनही धक्क्यातून सावरलेलं नाही. काही दिवसांपासून धर्मेंद्र आजारी होते. त्यांना आधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी घरीच अंतिम श्वास घेतला. त्यांचं पार्थिव अँम्ब्युलन्समधून थेट स्मशानभूमीत नेण्यात आलं. चाहत्यांना धर्मेंद्र यांना शेवटचं पाहताही आलं नाही. दोन दिवसांनी धर्मेंद्र यांच्यासाठी प्रेयर मीट ठेवण्यात आली. तर त्याचवेळी हेमा मालिनी यांनी त्यांच्या घरी वेगळी प्रेयर मीट ठेवली होती. या गोष्टीची खूप चर्चा झाली. आता निर्माते मनोज देसाई यांनी 'बरं झालं हेमा मालिनी इकडे आल्या नाहीत' असं वक्तव्य केलं आहे. ते असं का म्हणाले?
विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत मनोज देसाई म्हणाले, "धर्मेंद्र यांच्या प्रेयर मीटवेळी हेमाजी तिथे नव्हत्या हे बघून मला अजिबातच नवल वाटलं नाही. कोणताही वाद होऊ नये यासाठी त्यांनी आधीच वेगळी प्रेयर मीट ठेवली होती. एका अर्थी बरंच झालं त्या इकडे आल्या नाहीत. धर्मेंद्र आणि हेमा एकमेकांच्या खूप जवळ होते. तिथे जर त्यांना कोणी काही बोललं असतं तर उगाचच शांतता भंग झाली असती. यामुळे त्यांनी त्यांच्या घरी स्वतंत्र शोकसभा ठेवली ते बरंच झालं."
ते पुढे म्हणाले, "प्रेयर मीटवेळी गाड्यांची मोठी रांग होती. माझी गाडी ८६ व्या नंबरवर होती. तिथे प्रेयर मीटवेळी भजनही करण्यात आलं. मी सनी देओलला म्हणालो की बरेच लोक येत आहेत मी फ्रंट गेटने जातो. तर त्याने मी आल्याबद्दल माझे आभार मानले. मी नंतर बाहेर कारची वाट पाहत ४५ मिनिटं उभा होतो. कारण खूपच गर्दी होती."
हेमा मालिनी यांनी नुकतीच दिल्लीतही प्रेयर मीट आयोजित केली होती. यावेळी राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. धर्मेंद्र यांच्या आठवणी सांगताना हेमा मालिनींना अश्रू अनावर झाले होते. तेव्हा त्यांच्या दोन्ही मुली ईशा आणि अहाना यांनी त्यांना सावरलं.