'बॉर्डर २' चित्रपटातून 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला बाहेर काढण्यासाठी दिग्दर्शकावर दबाव होता? निर्मात्याने खरं सांगितलंच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:05 IST2026-01-29T16:27:55+5:302026-01-29T17:05:48+5:30
"तर मग चित्रपट बनवायला नको...",'बॉर्डर २'मधील कलाकारांच्या कास्टिंगवरून झालेल्या ट्रोलिंगबद्दल निर्मात्यांनी मांडलं मत

'बॉर्डर २' चित्रपटातून 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला बाहेर काढण्यासाठी दिग्दर्शकावर दबाव होता? निर्मात्याने खरं सांगितलंच
Border 2 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलची मुख्य भूमिका असलेला बॉर्डर २ सिनेमाची जगभरात चर्चा आहे. २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने अनेक बिग बजेट चित्रपटांना पछाडलं आहे.बॉर्डर-२ च्या कथेसह चित्रपटातील गाणी आणि कलाकारांच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होताना दिसतं. सिनेमात सनी देओलसह वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी अशा तगड्या कलाकारांची फळी आहे.
'बॉर्डर-२'या चित्रपटाबाबतीत हिंदी सिनेसृष्टीत खूप चर्चा झाली होती. बॉर्डर-२ प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांना अनेक चांगल्या वाईट गोष्टींना सामोरं जावं लागलं. जेव्हा चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल उलगडा करण्यात आला त्यावेळी दिलजीत दोसांझला चित्रपटात कास्ट केल्याबद्दल निर्मात्यांना खूप टीका सहन करावी लागली. याचं कारण पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्याचदरम्यान दिलजीत पाक अभिनेत्रीसोबत काम करत होता, त्याच्या या निर्णयामुळे अनेकांनी अभिनेत्यावर टीकेची झोड उठलवली आणि त्याला बॉयकॉट करण्य़ाची मागणी केली.
आता टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच चित्रपटाच्या यशाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले,"आम्हाला खूप आनंद होत आहे. लोक चित्रपट पाहिल्यानंतर मेसेज करत आहेत की तुम्ही आमच्या अपेक्षांवर खरे उरतला आहात. हे पाहून खूप छान वाटतं. जेव्हा आपण बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की लोकांना आपली कलाकृती खरंच आवडते आहे."
दिलजीत दोसांझच्या कास्टिंगबद्दल भुषण कुमार म्हणाले, "दिग्दर्शकाला चित्रपटात तीन नवीन चेहरे पाहिजे होते. ज्यामध्ये अहान शेट्टी, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ ही नावे चर्चेत होती. सुदैवाने या तिघांनीही चित्रपटाची ऑफर स्विकारली. जेव्हा आम्ही अर्ध शूट पूर्ण केलं तेव्हा लोकांनी दिलजीतला चित्रपटातून काढून टाकण्यासाठी आमच्यावर दबाव आणण्यात आला. पण,ट्रोलिंगला घाबरून आमच्यासारखी कंपनी कलाकार बदलू लागली तर मग चित्रपट बनवायलाच नको." असा खुलासा करत भुषण कुमार यांनी दिलजीतची बाजू मांडली.