मुलांना कोणत्या धर्माची शिकवण देते? युजरच्या प्रश्नावर प्रिती झिंटाने व्यक्त केली खंत; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:20 IST2025-04-30T17:11:09+5:302025-04-30T17:20:01+5:30
गेल्या काही वर्षांपासून प्रिती अमेरिकेत स्थायिक आहे. २०२१ साली तिला सरोगसीच्या माध्यमातून जुळी मुलं झाली.

मुलांना कोणत्या धर्माची शिकवण देते? युजरच्या प्रश्नावर प्रिती झिंटाने व्यक्त केली खंत; म्हणाली...
अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) अनेक वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहे. अधूनमधून ती भारतात येत असते. तसंच ती आयपीएलच्या पंजाब किंग्स संघाची मालकीण आहे. सध्या प्रिती आयपीएलसाठी भारतातच असून संघाच्या प्रत्येक सामन्यासाठी हजर असते. प्रितीने २०१६ साली जेन गुडइनफसोबत लग्नगाठ बांधली. सरोगसीच्या माध्यमातून तिला जुळी मुलं झाली. प्रिती आपल्या मुलांना कोणत्या धर्माचं पालन करण्यास शिकवते अशा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर तिने काय भाष्य केलं वाचा.
'डिंपल गर्ल' प्रिती झिंटाने नुकतंच ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने आपण मुलांना हिंदू धर्माची शिकवण देत असल्याचा खुलासा केला. अभिनेत्रीला एका युजरला उत्तर देत लिहिले, "भारतापासून दूर परदेशात राहत असल्यामुळे माझी मुलं भारताशी जोडलेली आपली नाळ विसरणार नाहीत याची मी काळजी घेते. माझी मुलं अर्धे भारतीय आहेत. माझा पती नास्तिक आहे त्यामुळे आम्ही मुलांना हिंदू धर्माची शिकवण देत आहोत.मुलांना भारत आणि हिंदू धर्माविषयी सांगताना मला गर्व वाटतो. पती आणि मुलांवरुन मला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागतो याचं दु:ख होतं. माझ्या निवडीचं नेहमीच राजकारण केलं गेलं आहे. मी कोण आहे हे सतत मला सांगावं लागतं."
प्रितीला २०२१ साली जुळी मुलं झाली. जय आणि जिया अशी त्यांची नावं आहेत. तिने अजूनही त्यांचा चेहरा दाखवलेला नाही. प्रिती लवकरच 'लाहोर १९४७' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये ती सनी देओलसोबत झळकणार आहे. आमिर खान सिनेमाची निर्मिती करत आहे.