पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला धक्का, 'अबीर गुलाल' चित्रपटासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:31 IST2025-04-24T15:31:29+5:302025-04-24T15:31:39+5:30
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला धक्का, 'अबीर गुलाल' चित्रपटासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
Pahalgam Terror Attack: काश्मीरमध्ये मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात अंदाधुंद गोळीबार करून २८ जणांची निर्घृण हत्या (Tourists Killed In Pahalgam) केली. त्यापैकी बहुतेक पर्यटक होते. या हल्ल्यातील तीन दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाकिस्तान विरोधात लोकांमध्ये संतापाचे वातावरण असून दहशतवादाची किड मुळापासून काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. या हल्ल्यानंतर आता सरकारकडून पाकिस्तान विरोधात कडक पाऊले उचचली जात आहेत. भारत सरकारकडून सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आलेत. एवढेच नाही तर या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम अभिनेत्री वाणी कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) यांचा आगामी चित्रपट 'अबीर गुलाल' वर पडला आहे. लोकांचा रोष पाहता सरकारनं चित्रपटासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय.
फवाद खानच्या 'अबीर गुलाल' हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नसल्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून घेण्यात आल्याचं समोर आलं आहे. याबद्दल पीटीआयकडून ट्विट करण्यात आलं आहे. 'अबीर गुलाल' हा चित्रपट ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. या सिनेमाचं दिग्दर्शन आरती एस बागडी यांनी केलं आहे. या चित्रपटावरून आधीच वाद झाला होता. मनसेने फवाद खानच्या बॉलिवूडमध्ये परतण्यास विरोध केला होता. महाराष्ट्रात पाकिस्तानी अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही अशी धमकी दिली होती. अखेर आता दशतवादी हल्ल्यानंतर हा चित्रपट भारतात प्रदर्शित केला जाणार नाही. दरम्यान, २०१६ मध्ये झालेल्या 'उरी हल्ल्या'नंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांसाठी आपले दरवाजे बंद केले होते. बऱ्याच काळानंतर पाकिस्तानी स्टार्स पुन्हा काम करू लागले होते.
I&B Ministry sources say the movie ‘Abir Gulal’ starring Pakistani actor Fawad Khan will not be allowed to release in India. pic.twitter.com/tJxCuW74g2
— Press Trust of India (@PTI_News) April 24, 2025
भारताने उचलले पाकिस्तानविरोधात थेट पाऊल
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काल दिल्लीमध्ये एक महत्वपूर्ण बैठक झाली आणि पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलली गेली. भारत सरकारने ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे. तसेच पाकिस्तानी राजनयिकांना देखील सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. भारत एका मागून एक पाकिस्तानला झटके देताना दिसतोय. भारताने आता पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. सरकार पाकिस्तानवर अजून काय कारवाई करते, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. दुसरीकडे पाकिस्तानने भारतांच्या आरोपानंतर म्हटले की, आमचे या हल्ल्याशी काही देणे घेणे नाही.