"आयोजक पैसे घेऊन पळाले अन्...", कॉन्सर्टला ३ तास उशिरा आल्याबद्दल नेहा कक्करचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:43 IST2025-03-27T17:43:14+5:302025-03-27T17:43:53+5:30
नेहा कक्कर कॉन्सर्टला ३ तास उशिरा पोहोचली होती. त्यातच ती स्टेजवर रडली यामुळे ट्रोलही झाली होती.

"आयोजक पैसे घेऊन पळाले अन्...", कॉन्सर्टला ३ तास उशिरा आल्याबद्दल नेहा कक्करचं स्पष्टीकरण
गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) नुकतीच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झालेल्या कॉन्सर्टसाठी ३ तास उशिरा पोहोचली. यामुळे प्रेक्षक चांगलेच संतापले होते. त्यात उशिरा आल्यावर नेहा स्टेजवरच रडायला लागली. सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. तसंच उशिरा आल्याने टीकाही सहन करावी लागली. मात्र ती का उशिरा पोहोचली याचं मोठं कारण आता समोर आलं आहे. तिनेच सोशल मीडियावर पोस्ट करत याचा उलगडा केला आहे.
नेहा कक्करने इन्स्टाग्रामवर लिहिले, "मी कॉन्सर्टसाठी ३ तास उशिरा आले हे सगळ्यांनाच दिसत आहे. पण कोणीही एकदा तरी मला विचारलं का की माझ्यासोबत आणि माझ्या बँडसोबत नक्की काय काय घडलं होतं? मी स्टेजवर आल्यावर ऑडियन्सला काहीच सांगितलं नाही. कारण मला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता. मी कोण आहे एखाद्याला शिक्षा देणारी? पण आता माझं नाव खराब होतंय त्यामुळे मी बोलणार."
"मी ती कॉन्सर्ट मेलबर्नच्या ऑडियन्ससाठी अक्षरश: मोफत केली आहे. आयोजकांनी पैसे घेऊन पळ काढला. माझ्या बँडला ना खायला अन्न, ना राहायला हॉटेल आणि ना साधं पाणी मिळालं. माझे पती आणि इतर मुलं गेले आणि बँडसाठी गोष्टी पुरवल्या. असं सगळं असतानाही आम्ही स्टेजवर गेलो. थोडाही आराम न करता परफॉर्म केलं. कारण माझे चाहते तिथे कित्येक तास माझी वाट पाहत होते. कॉन्सर्टआधी साउंडचेकही करायला वेळ लागला. कारण साउंड व्हेंडरला पैसे मिळाले नसल्याने त्याने साउंड ऑन करायला नकार दिला. शेवटी कित्येक वेळानंतर ना मला लवकर पोहचता आलं ना साउंड चेक झालं. इतकंच नाही तर ही कॉन्सर्ट होणार आहे का याचीही शंकाच होती. आयोजक माझ्या मॅनेजरचे फोन उचलत नव्हते. अजून बरंच काही सांगण्यासारखं आहे पण सध्या एवढं पुरे."
"जे लोक माझ्या बाजूने बोलले त्यांचे खूप आभार. त्यांच्यासोबत घडल्यासारखंच त्यांनी मला पाठिंबा दिला. माझी परिस्थिती समजून घेण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले ते पाहून मी भारावून गेले. त्या दिवशी ज्यांनी माझी कॉन्सर्ट अटेंड केली, माझ्यासोबत रडले आणि दिलखुलास नाचले त्यांचेही मनापासून आभार. माझ्यासाठी कायम उभे राहिले माझ्यावर प्रेम केलंत त्याबद्दल खूप धन्यवाद."