"मी काही दूध मलाई नाही, बंटा की बॉटल तर...", गायिकेने Male Rappers वर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:44 IST2024-12-06T15:44:08+5:302024-12-06T15:44:37+5:30
सर्व भारतीय पुरुष आणि महिलांना काहीच अडचण नाही? असा सवालही तिने उपस्थित केला

"मी काही दूध मलाई नाही, बंटा की बॉटल तर...", गायिकेने Male Rappers वर साधला निशाणा
बिग बॉस ओटीटी फेम आणि गायिका नेहा भसीनने (Neha Bhasin) नुकतंच रॅपर्सवर निशाणा साधला आहे. सोशल मीडिया पोस्ट करत तिने रॅप करणाऱ्या गायकांना सुनावलं आहे. त्यांच्या रॅपमधील शब्द हे महिलांचा अपमान करणारे असतात आणि यावर महिलांना काहीच आक्षेप कसा नसतो असा सवाल तिने उपस्थित केला आहे. कोणाही रॅपरचं नाव न घेता तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत टीका केली आहे.
नेहा भसीनने काही दिवसांपूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट केली जी आता व्हायरल होत आहे. ती लिहिते, "मला खरंच त्या below average आणि गायक होऊ पाहणाऱ्या पुरुष रॅपर्सचा कंटाळा आहे जे आपल्या गाण्यात महिलांबाबतीत विचित्र लिहितात. विशेष म्हणजे या गाण्यांवर सर्व भारतीय पुरुष आणि महिलांना काहीच अडचण नाही? सेक्सिझमच्या या ढोंगीपणाला काही मर्यादा आहे की नाही? मुलांनी केलं तर भाई, ड्युड. मुलींनी केलं तर कॅरेक्टर ढीला."
या पोस्टसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "माझ्याकडे कोणताही पिंजरा नाही ज्यातून मला बाहेर पडायचं आहे. मी दूध मलाईही नाही आणि बंटा की बॉटल तर अजिबातच नाही. मोठे व्हा रे."
नेहा भसीनने 'मेरे ब्रदर की दुल्हन','गुंडे' सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. नेहा अनेकदा तिच्या तब्येतीविषयी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिला टीनएजपासूनच् प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर हा गंभीर आजार झाला आहे.