तू है तो दिल धड़कता है! माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी व्यक्त केले एकमेकांवरील प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:37 IST2025-10-17T14:36:46+5:302025-10-17T14:37:08+5:30
माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या लग्नाला २६ वर्ष झाली. दोघेही बॉलिवूडमधील परिपूर्ण जोडप्यांपैकी एक आहेत.

तू है तो दिल धड़कता है! माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी व्यक्त केले एकमेकांवरील प्रेम
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आज १७ ऑक्टोबर रोजी तिच्या लग्नाचा २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. १७ ऑक्टोबर १९९९ मध्ये माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने लग्नबंधनात अडकले होते. १७ ऑक्टोबर १९९९ पासून ते आजपर्यंत माधुरी आणि नेने यांचा सुखाचा संसार सुरु आहे. लग्नाच्या या खास वाढदिवसाच्या माधुरी दीक्षित आणि डॉ नेने यांनी एकमेंकाना शुभेच्छा दिल्यात. दोघांनी खास व्हिडीओ शेअर करत प्रेम व्यक्त केलं आहे.
माधुरी दीक्षितने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पती श्रीराम नेने यांच्यासोबतच्या सुंदर क्षणांचे फोटो एकत्र करुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी आणि नेने यांचा सुखी संसाराची झलक पाहायला मिळते. कॅप्शनमध्ये माधुरीने आपल्या भावना व्यक्त केल्या. तिनं लिहलं, "क्षणांपासून आठवणींपर्यंत, हातात हात घालून आयुष्याची २६ वर्षे सोबत चालत आलो आहोत. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा डॉ श्रीराम नेने".
तर श्रीराम नेने यांनीही इन्स्टाग्रामवर माधुरीसाठी खास व्हिडीओ शेअर केलाय. त्यांनी लिहलं, "माझ्या प्रियेला, लग्नाच्या २६व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आणखी एक सुंदर वर्ष संपलं आणि पुढे अजून कितीतरी आनंदी वर्षं आपली वाट पाहत आहेत. तुझ्यासोबतचं प्रत्येक वर्ष मागच्या वर्षापेक्षा अधिक सुंदर वाटतं. आणखी अनेक आनंदी वर्ष मुलांना वाढवत, जगाला थोडंसं चांगलं बनवत, सगळ्यांचं मनोरंजन करत आणि एकत्र भविष्याकडे प्रेमाने प्रवास करत राहू", असं म्हणत डॉ नेने यांनी माधुरीवरचं प्रेम व्यक्त केलं.
माधुरी दीक्षितने १९९९ मध्ये डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून आपल्या असंख्य चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. त्यानंतर काही वर्षांपूर्वी ती भारतात परतली आणि पुन्हा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली. लग्नाच्या २६ वर्षांनंतरही माधुरी आणि श्रीराम नेने यांच्यातील केमिस्ट्री आणि प्रेम कायम आहे. आज, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चाहते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून या आदर्श कपलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.