"नक्कीच निराशा झाली...", ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर, किरण रावची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 14:06 IST2024-12-18T14:06:10+5:302024-12-18T14:06:45+5:30
सिनेमाच्या टीमने अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे.

"नक्कीच निराशा झाली...", ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर, किरण रावची पहिली प्रतिक्रिया
आमिर खान (Aamir Khan) निर्मित आणि किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित 'लापता लेडीज' (Laapata Ladies) सिनेमाऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आला होता. यामुळे सर्व कलाकार आणि सिनेमाची संपूर्ण टीम उत्साहित होती. त्यांनी परदेशातही सिनेमाचं प्रमोशन केलं. मात्र आज सिनेमा ९७ व्या ऑस्कर अवॉर्ड २०२५ च्या शर्यतीतून बाहेर गेल्याची बातमी आली आणि सर्वांचीच निराशा झाली. सिनेमा अंतिम १५ मध्ये जागा मिळवता आली नाही. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायंसेजने आज याची घोषणा केली. आता यावर सिनेमाच्या टीमची रिअॅक्शन समोर आली आहे.
'लापता लेडीज' सिनेमाच्या टीमकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यांनी लिहिले, "लापता लेडीज यावर्षी अॅकॅडमी अवॉर्ड्सच्या शॉर्टलिस्टमधून बाहेर पडला. यामुळे आम्ही नक्कीच निराश झालो आहोत. पण आम्ही या प्रवासात तुम्ही दिलेल्या प्रचंड पाठिंबा आणि विश्वासासाठी आभारी आहोत. आम्ही आमिर खान प्रोडक्शन्स, जियो स्टुडिओज आणि काइंडलिंग प्रोडक्शन्सकडून फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया(FFI) च्या ज्यूरींनाही धन्यवाद देतो ज्यांनी आमच्या या सिनेमाचा विचार केला. जगभरातील अप्रतिम सिनेमांसोबत या सम्मानजनक प्रक्रियेत सहभागी होता आलं याचा आम्हाला अभिमान वाटतो. शॉर्टलिस्ट झालेल्या त्या सर्व १५ सिनेमांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आमच्यासाठी हा शेवट नाही उलट पुढे जाण्यासाठीचं आणखी एक पाऊल आहे. आम्ही जगासमोर आणखी दमदार गोष्टी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करु."
दरम्यान ब्रिटिश दिग्दर्शक संध्या यांचा 'संतोष' सिनेमा शॉर्टलिस्ट झाला आहे. हा हिंदी सिनेमा असला तरी यूकेकडून पाठवण्यात आला आहे. २ मार्च रोजी ऑस्कर २०२५ चा समारोह होणार आहे. सगळ्यांचं लक्ष याकडे लागलं आहे.