"ती मुलगीच समोरुन आली...", कुनिका सदानंदने उदित नारायण यांची बाजू घेत चाहतीला दिला दोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:05 IST2025-03-06T11:04:25+5:302025-03-06T11:05:07+5:30
अभिनेत्री कुनिका सदानंदने व्हिडिओतील त्या चाहतीचीच चूक असल्याचं सांगत उदितजींचा बचाव केला आहे.

"ती मुलगीच समोरुन आली...", कुनिका सदानंदने उदित नारायण यांची बाजू घेत चाहतीला दिला दोष
लोकप्रिय गायक उदित नारायण (Udit Narayan) त्यांच्या एका व्हिडिओमुळे चांगलेच चर्चेत आले होते. एका चाहतीला त्यांनी चक्क किस केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली. सोशल मीडियावर तर उदित नारायण यांची खूप खिल्लीही उडवली गेली. गायक अभिजीत भट्टाचार्यांनी मात्र उदितजींची बाजू घेतली होती. आता अभिनेत्री कुनिका सदानंदने (Kunickaa Sadanand) व्हिडिओतील त्या चाहतीचीच चूक असल्याचं सांगत उदितजींचा बचाव केला आहे.
हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री कुनिका सदानंद म्हणाली,"उदित नारायणजींनी किस केलं ते ठीक केलं. पण ओठांवर करायला नको होतं. गालावर करायला हवं होतं. मला वाटतं हा त्यांचा दोन वर्ष जुना व्हिडिओ आहे. मी कोणाला दोष देणार नाही. पण ती मुलगी सुद्धा स्वत:हून समोर आल्याचं दिसतंय ना. तु्म्ही सगळाच दोष पुरुषाला का देताय? हे चुकीचं आहे. ते उदित नारायण आहेत म्हणून?"
ती पुढे म्हणाली, "मला माहितीये आता यावरु महिला मला ट्रोल करतील, नावं ठेवतील. पण तुम्ही पुरुषाला का नावं ठेवताय? ती मुलगी काय करतीये हेही पाहा. अनेक जण उदितजींची स्तुती करत आहेत, त्यांच्यासोबत फोटो काढायला येत आहेत. ती मुलगी आली आणि तिने आधी किस केलं. तिने तर काही आक्षेपही घेतला नाही. काही लोक उदितजींची 'पद्मभूषण'साठी शिफारस करत होते म्हणून त्यांचा विरोध करणाऱ्यांनी हा व्हिडिओ मुद्दामून अपलोड केला असेल".