'मै निकला गड्डी लेके..' किली पॉलचा बहिणीसोबत धम्माल डान्स, सनी पाजीनेही शेअर केला Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 15:20 IST2023-07-11T15:19:34+5:302023-07-11T15:20:28+5:30
गदरच्या गाण्यांची टांझानियाच्या भावंडांनाही पडली भुरळ

'मै निकला गड्डी लेके..' किली पॉलचा बहिणीसोबत धम्माल डान्स, सनी पाजीनेही शेअर केला Video
सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २००० साली रिलीज झालेला गदर १ ब्लॉकबस्टर ठरला होता. तारा सिंगचं देशप्रेम, सकीनासोबतची लव्हस्टोरी, पाकिस्तानात जाऊन त्यांच्याच लोकांना सुनावणं हे सारंकाही तेव्हा प्रेक्षकांना पसंत पडलं होतं. 'गदर २' मुळे गदर १ च्या आठवणी ताज्या झाल्या. गदर मधलं विशेष आकर्षण म्हणजे त्यातील गाणी. 'मै निकला ओ गड्डी लेके' हे गाणं इतक्या वर्षांनीही हायवेवर एखाद्या ट्रकमध्ये हमखास ऐकू येतं. तर याच गाण्याची भुरळ साता समुद्रापार असलेल्या किली पॉल (Kili Paul) आणि नीमा पॉल या भावंडांना पडली आहे.
भारतातील सर्वात जास्त ट्रेंडिंग असणाऱ्या गाण्यांवर किली पॉल आणि नीमा पॉल हे बहीण भाऊ नेहमी रील बनवतात. हे दोघं मूळचे टांझानियाचे आहेत. त्यांचं भारतीय सिनेमातील गाणी, डायलॉग्सवर विशेष प्रेम आहे. टांझानियात राहून ते आपल्या खास शैलीत ट्रेंडिंग गाण्यांवर डान्स करतात, रील बनवतात. भारतात सर्वांनाच त्यांचे हे रील्स आवडतात. आता किली आणि नीमा पॉलला गदर च्या 'मै निकला ओ गड्डी लेके' या गाण्यानेही भुरळ पाडली आहे. किलीने शेरवानी आणि नीमाने पंजाबी ड्रेस घातला आहे. भारतीय पोषाख परिधान करत ते सनी देओलच्या गाण्यावर बिंधास्त डान्स करत आहेत.
किली पॉलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. खुद्द सनी देओलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'गदर 2' ११ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. गदर १ च्या पुढची कथा यामध्ये दाखवण्यात येणार आहे. तब्बल २२ वर्षांनी सनी देओल आणि अमिषा पटेल एकत्र दिसणार आहेत.