"तुमचा मूर्ख ऑस्कर तुमच्याकडेच ठेवा, आमच्याकडे राष्ट्रीय पुरस्कार आहे"; कंगना राणौतचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 10:34 IST2025-03-17T10:30:50+5:302025-03-17T10:34:37+5:30
युजरच्या ट्वीटवर कंगनाचं बिंधास्त वक्तव्य, थेट अमेरिकेलाच सुनावलं

"तुमचा मूर्ख ऑस्कर तुमच्याकडेच ठेवा, आमच्याकडे राष्ट्रीय पुरस्कार आहे"; कंगना राणौतचं विधान
खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) नेहमीच तिच्या बिंधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आताही तिने असंच एक वक्तव्य केलं आहे. यावर्षी कंगनाचा 'इमर्जन्सी' सिनेमा रिलीज झाला. यामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली. कंगनाला पडद्यावर पाहून लोकांना खरोखरंच साक्षात इंदिरा गांधीच वाटल्या इतका दमदार अभिनय तिने केला. दरम्यान यावेळी कंगनाने नुकत्याच झालेल्या ऑस्कर पुरस्कारांवर निशाणा साधला आहे.
कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. होळीच्या दिवशी सिनेमा ओटीटीवर आला. सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादावर कंगनाने आभार मानले आहे. ट्विटर अनेकांनी सिनेमा पाहून प्रतिक्रिया दिली आहे. एका युझरने लिहिले,'इमर्जन्सी सिनेमाला भारताकडून ऑस्करसाठी पाठवलं पाहिजे. कंगनाने शानदार सिनेमा बनवला आहे.' युजरच्या या प्रतिक्रियेवर कंगनाने रिट्वीट करत लिहिले, "पण विकसनशील देशांना धमकावणारा आणि घाबरवणारा अमेरिका कधीच आपला खरा चेहरा स्वीकारणार नाही. या सर्व गोष्टी इमर्जन्सी सिनेमा दाखवण्यात आल्या आहेत आणि त्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. त्यांनी आपला मूर्खतापूर्ण ऑस्कर स्वत:जवळच ठेवावा. कारण आमच्याकडे राष्ट्रीय पुरस्कार आहे."
कंगनाच्या या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा आहे. यंदा कंगनाला 'इमर्जन्सी' खरंच राष्ट्रीय पुरस्कार मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. या सिनेमाने १६ कोटींची कमाई केली. कंगनाने याआधी दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. २०१४ साली 'क्वीन' आणि २०१५ साली 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.