राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर कंगनाच्या Emergency ला मुहुर्त मिळाला, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 13:50 IST2024-01-23T13:37:46+5:302024-01-23T13:50:51+5:30
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेनंतर कंगनाची मोठी घोषणा! Emergency सिनेमाची रिलीज डेट जाहीर

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर कंगनाच्या Emergency ला मुहुर्त मिळाला, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत कायमच चर्चेत असते. कंगना नुकत्याच पार पडलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येला गेली होती. प्राणप्रतिष्ठापनेनंतर कंगनाने तिच्या सिनेमाबाबत मोठी घोषणा केली आहे. कंगनाने आगामी 'इमर्जन्सी' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. पोस्ट शेअर करत कंगनाने चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. कंगानाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. २०२३च्या ऑक्टोबरमध्ये 'इमर्जन्सी' सिनेमा प्रदर्शित होणार होता. त्यानंतर या सिनेमाची रिलीज डेट बदलून २४ नोव्हेंबर करण्यात आली होती. पण, त्यानंतर पुन्हा कंगनाच्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती. आता अखेर कंनगाच्या बहुचर्चित 'इमर्जन्सी' सिनेमाची रिलीज डेट ठरली आहे. १४ जूनला कंगनाचा 'इमर्जन्सी' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.
'इमर्जन्सी' सिनेमातून भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर भाष्य करण्यात येणार आहे. १९७५ सालचा आणीबाणीचा काळ यातून दाखविण्यात येणार आहे. कंगना रणौतने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात कंगनाबरोबर श्रेयस तळपदे, भुमिका चावला, अनुपम खेर, सतिश कौशिक यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.