कंगना रणौतची नव्हती हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवण्याची इच्छा? जुनं ट्वीट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 13:25 IST2024-03-26T13:23:32+5:302024-03-26T13:25:12+5:30
Lok Sabha Elections 2024: कंगनाला असं राज्य हवं होतं जिथे...

कंगना रणौतची नव्हती हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवण्याची इच्छा? जुनं ट्वीट व्हायरल
Lok Sabha Elections 2024: कंगना रणौतने (Kangana Ranaut) अभिनय क्षेत्रात तर डंका गाजवलाच आहे. पण आता ती निवडणूकीच्या रिंगणातही उतरली आहे. कंगनाला भाजपाकडून लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारीचं तिकीट मिळालं. यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. जन्मभूमी मंडीहिमाचल प्रदेशमधून ती निवडणूक लढवणार आहे.मात्र कंगनाची हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवण्याची इच्छाच नव्हती हे तिच्या एका जुन्या ट्वीटमधून स्पष्ट होतं. तिचं ट्वीट आता व्हायरल होतंय.
नेहमी आपले राजकीय विचार प्रकट करणारी अभिनेत्री कंगना रणौत आता प्रत्यक्षात राजकारणात येण्यास सज्ज आहे. भाजपा राष्ट्रीय नेतृत्वाने कंगनाला हिमाचल प्रदेश येथील मंडी येथून उभं केलं आहे. कंगनाचं हे मूळ गाव असल्याने तिला तिथल्या लोकांच्या समस्या माहित आहेत. पण कंगनाला हिमाचल प्रदेश नाही तर अन्य राज्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. हे तिच्या २०२१ सालच्या एका ट्वीटमधून स्पष्ट होतं.
काय होतं तिचं ट्वीट?
'मला 2019 च्या लोकसभा निवडणूकीसाठी ग्वालियरचा पर्याय देण्यात आला होता. हिमाचल प्रदेशची संख्या जेमतेम 60/70 लाख आहे. तिथे ना गरिबी ना गुन्हे आहेत. जर मी राजकारणात आले तर मला असं राज्य पाहिजे जिथे गोष्टी गुंतागुंतीच्या असतील. मी त्यावर काम करु शकेन आणि त्या क्षेत्रातही क्वीन बनेन.'
कंगनाने एका व्यक्तीच्या ट्वीटवर हे उत्तर दिलं होतं. त्या व्यक्तीने कंगना मंडी मधून निवडणूक लढेल असं ट्वीट तीन वर्षांपूर्वीच केलं होतं. यावर कंगनाने हे ट्वीट केलं होतं. 'तु्झ्यासारख्या छोट्या लोकांना या मोठ्या गोष्टी समजणार नाहीत' असंही ती त्याला म्हणाली होती.