कंगना राणौतनं डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींची केली तुलना, पण लगेच डिलीट केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 09:18 IST2025-05-16T09:17:43+5:302025-05-16T09:18:39+5:30

जेपी नड्डांचा कॉल, कंगनाकडून ती पोस्ट डिलीट

Kangana Ranaut Deletes Donald Trump Pm Narendra Modi Post Controversy 2025 | कंगना राणौतनं डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींची केली तुलना, पण लगेच डिलीट केली पोस्ट

कंगना राणौतनं डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींची केली तुलना, पण लगेच डिलीट केली पोस्ट

Kangana Ranaut on Trump-Modi: अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात पाऊल टाकलेली 'क्वीन' कंगना राणौत (Kangana Ranaut) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कोणतीही भीडभाड न ठेवता कोणत्याही विषयावर ती अगदी स्पष्टपणे बोलताना दिसते. सोशल मीडियावर ती विविध विषायवर रोखठोक मत मांडते. पण, यावरुन अनेकदा वाद निर्माण होतात. यावेळीही असंच काहीस झालं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्यानं कंगना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.  कंगनाने ट्रम्प यांचे ट्विट रिट्विट करत एक वादग्रस्त विधान केलं आणि त्यानंतर लगेचच ते पोस्ट डिलीटही केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच अ‍ॅपलच्या सीईओ टिम कुक यांना भारतात उत्पादन करू नये, असं सुचवणारं एक ट्विट केलं होतं. हे ट्विट शेअर करत कंगनाने लिहिलं, "डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, पण जगातील सर्वात प्रिय नेते नरेंद्र मोदी आहेत. ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ आहे, पण मोदींचा तिसरा. ट्रम्प हे अल्फा पुरुष आहे यात शंका नाही, पण आपले पंतप्रधान या सर्व अल्फा पुरुषांचे वडील आहेत. तुम्हाला काय वाटते? हा वैयक्तिक मत्सर आहे की राजनैतिक असुरक्षितता?", असा सवाल तिनं केला होता.

कंगनाच्या या विधानानंतर सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. अनेकांनी कंगनाच्या या वक्तव्यावर टीका केली आणि हे ट्विट डिलीट करण्याची मागणी केली. काही वेळातच कंगनाने हे ट्विट हटवले. यानंतर कंगनाने  आणखी एक पोस्ट शेअर करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेवरून ते डिलीट केल्याचं सांगितलं.  कंगनाने लिहलं, "आदरणीय अध्यक्ष श्री जेपी नड्डा यांनी मला फोन करून ट्रम्प यांच्यावरील पोस्ट डिलीट करण्यास सांगितलं. मी त्यांचं म्हणणं मान्य करत पोस्ट काढून टाकली आहे. माझं वैयक्तिक मत पोस्ट केल्याबद्दल मला माफ करा, सूचनांनुसार मी ते इन्स्टाग्रामवरूनही लगेच काढून टाकले. धन्यवाद".


काय म्हणाले ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी दोहामधील एका कार्यक्रमात टिम कुक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, "टिम, तू माझा मित्र आहेस... आम्ही तुमच्याशी खूप चांगले वागतोय. तुम्ही ५०० अब्ज डॉलर्सची कंपनी बांधत आहात, पण आता मला समजले की तुझी कंपनी भारतात उत्पादन करत आहे. तू भारतात कारखाने काढतो आहेस. मला ते मंजूर नाही. भारतासाठी करायचे असेल तर कर. पण आमच्यासाठी तुला अमेरिकेतच उत्पादन करावे लागेल. पण भारत हा जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे. तिथे विक्री करणे कठीण आहे. भारताने आम्हाला एक प्रस्ताव दिला आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्या वस्तूंवर कोणताही कर लादणार नाही असे आश्वासन दिले आहे".

 

Web Title: Kangana Ranaut Deletes Donald Trump Pm Narendra Modi Post Controversy 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.