कसा असणार ऋतिक रोशन आणि एनटीआरचा 'वॉर २' सिनेमा? अभिनेत्याने स्वत:च सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:09 IST2025-05-21T15:08:59+5:302025-05-21T15:09:28+5:30
'वॉर २' हा चित्रपट फार मोठ्या स्केलवर बनवलेला असल्याचं ऋतिक रोशननं सांगितलं आहे.

कसा असणार ऋतिक रोशन आणि एनटीआरचा 'वॉर २' सिनेमा? अभिनेत्याने स्वत:च सांगितलं!
सध्या 'वॉर २' सिनेमाच्या टीझरची प्रचंड चर्चा सुरू आहे. काल प्रदर्शित झालेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तो ट्रेंड करतोय. टीझरमध्ये कियारा आडवाणीचा बिकिनीमधील बोल्ड अंदाज पाहायला मिळालाय. तर अभिनेता हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरची जुगलबंदी जोरदार रंगली आहे. चाहत्यांनी दोन्ही अभिनेत्यांच्या दमदार लूकपासून ते अॅक्शन सीनपर्यंत सर्वच गोष्टींचे भरभरून कौतुक केलं आहे. यातच आता टीझरला मिळालेला प्रतिसाद पाहून ऋतिक रोशन भावूक प्रतिक्रिया दिली. तसेच चित्रपटात काय-काय पाहायला मिळणार हेही सांगितलं आहे.
ऋतिक रोशननं 'वॉर' ही फ्रँचायझी त्याच्यासाठी खूप खास असल्याचं सांगितलं. 'वॉर २' हा चित्रपट फार मोठ्या स्केलवर बनवलेला असून त्यात प्रेक्षकांना जोरदार अॅक्शन सीन पाहायला मिळणार असल्याचा खुलासा अभिनेत्यानं केला. तो म्हणाला, "ही फ्रँचायझी माझ्यासाठी खूप खास आहे. 'वॉर २' चा टीझर लोकांना किती आवडतोय हे पाहून खूप आनंद होतोय. हा एक फार मोठ्या स्केलवर बनवलेला चित्रपट आहे आणि प्रेक्षकांना भव्य अॅक्शन अनुभव मिळावा, यासाठी आम्ही पुर्ण प्रयत्न केलेत".
'वॉर २'मध्ये ऋतिक पुन्हा एकदा सुपर-स्पाय 'कबीर'च्या भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल तो म्हणाला, "मी लहानपणापासून अॅक्शन शैलीचा मोठा चाहता आहे आणि अशा चित्रपटांमध्ये काम करताना मला खूप मजा येते. कबीर या पात्रामुळे मला गेल्या अनेक वर्षांत खूप प्रेम मिळालं आहे, आणि पुन्हा एकदा हे पात्र साकारताना मला खूप आनंद झाला".
'वॉर २' हा बहुभाषिक सिनेमा १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. 'वॉर २' ही YRF स्पाय युनिव्हर्समधील सहावा सिनेमा असून या फ्रँचायझीमधील 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर', 'पठाण', आणि 'टायगर ३' हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.