छातीत अचानक दुखल्याने राकेश रोशन हॉस्पिटलमध्ये दाखल, ICU मध्ये झाले उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:46 IST2025-07-18T11:42:21+5:302025-07-18T11:46:09+5:30
राकेश रोशन यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. यामागचं मोठं कारण समोर आलंय

छातीत अचानक दुखल्याने राकेश रोशन हॉस्पिटलमध्ये दाखल, ICU मध्ये झाले उपचार
बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता राकेश रोशन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. १६ जुलै रोजी त्यांना छातीत वेदना जाणवल्यामुळे तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टी ही प्रक्रिया करण्यात आली. राकेश रोशन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्या चाहत्यांना काळजी वाटली आहे.
राकेश रोशन रुग्णालयात दाखल
सूत्रांच्या माहितीनुसार राकेश यांची प्रकृती आता आता सुधारत आहे आणि काही वेळ ICU मध्ये ठेवल्यानंतर त्यांना आता जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. राकेश रोशन यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या मुलीने सुनैना रोशनने माहिती देताना सांगितलं की, “बाबा आता बरे आहेत. त्यांच्या काही ब्लड टेस्ट केल्या असून त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. काळजीचं कारण नाही.” राकेश रोशन यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय हृतिक रोशन, सुनैना रोशन आणि हृतिकची मैत्रीण सबा आजाद यावेळी रुग्णालयात उपस्थित होते.
राकेश रोशन यांना याआधी कॅन्सर झाला होता, पण त्यांनी त्यावर यशस्वीपणे मात केली अन् ते बरे झाले. राकेश रोशन या वयातही फिट अँड फाईन आहेत. राकेश यांचा लेक आणि अभिनेता हृतिक रोशन सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘वॉर २’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र या सर्व गोंधळात हृतिक वडिलांच्या तब्येतीवरही लक्ष ठेऊन आहे. सध्या राकेश रोशन यांची स्थिती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चाहत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. राकेश बरं झाल्यावर लवकरच 'क्रिश ४'ची तयारी करणार आहेत.