पडद्यामागे घडतंय काहीतरी मोठं! मायकेल बे आणि ए.आर. रहमान एकत्र; कोण असणार या बिग बजेट फिल्मचा हिरो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:43 IST2025-12-16T17:22:27+5:302025-12-16T17:43:46+5:30
मेगा प्रोजेक्ट येतोय! हॉलिवूडचा 'अॅक्शन किंग' मायकेल बे बॉलिवूडमध्ये, ए.आर. रहमानची मिळणार साथ!

पडद्यामागे घडतंय काहीतरी मोठं! मायकेल बे आणि ए.आर. रहमान एकत्र; कोण असणार या बिग बजेट फिल्मचा हिरो?
'ट्रान्सफॉर्मर्स', 'बॅड बॉईज' आणि 'आर्मगेडन' सारख्या जागतिक स्तरावर गाजलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे निर्माते मायकेल बे (Michael Bay ) यांनी आता भारतीय निर्माते विनोद भानुशाली यांच्यासोबत हात मिळवला आहे. मायकेल बे आणि विनोद भानुशाली हे निर्मिती करत असलेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक असलेले ए. आर. रहमान हे संगीत देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मायकेल बे हे त्यांच्या चित्रपटांमधील भव्यता, हाय-ऑक्टेन अॅक्शन आणि जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी ओळखले जातात. हा नवीन चित्रपट 'भानुशाली स्टुडिओज लिमिटेड' च्या बॅनरखाली तयार होणार आहे. याचे दिग्दर्शन अँथनी डिसोझा करणार आहेत. तर याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे संगीताचे जादूगार ए.आर. रहमान असतील. मायकेल बे यांच्या हाय-ऑक्टेन अॅक्शनला रहमान यांच्या संगीताची जोड मिळाल्यानंतर प्रेक्षकांना पडद्यावर एक वेगळाच रोमांच पाहायला मिळेल.
स्टारकास्ट अद्याप गुलदस्त्यात
हा भव्य प्रकल्प सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. चित्रपटाची कथा नेमकी काय असेल आणि यामध्ये कोणते भारतीय किंवा हॉलिवूड स्टार्स दिसणार, याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.