"माझ्या भावना अनावर होत आहेत..."; धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी भावुक, शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:53 IST2025-11-28T15:50:20+5:302025-11-28T15:53:25+5:30
धर्मेेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी त्यांच्या आठवणीत भावुक झाल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्यासोबतचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत

"माझ्या भावना अनावर होत आहेत..."; धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी भावुक, शेअर केले खास फोटो
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काल, २७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या स्मरणार्थ प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आले होते. या प्रार्थना सभेला धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी गैरहजर होत्या. दरम्यान हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतच्या काही अविस्मरणीय कौटुंबिक क्षणांचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेमा मालिनींनी शेअर केले खास फोटो
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनानंतर आजवर कधीही न पाहिलेले कौटुंबिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्या मुली ईशा आणि अहाना देओल देखील धर्मेंद्र यांच्यासोबत हसताना आणि आनंदी दिसत आहेत.
हे खास फोटो शेअर करुन हेमा मालिनी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "काही खूप प्रेमळ कौटुंबिक क्षण... हे फोटो माझ्यासाठी खूप खास आहेत. हे क्षण यापूर्वी कधीही कोणाला दाखवले नव्हते. हे पाहून पुन्हा एकदा जुन्या आठवणी जागा झाल्या. भावना अनावर होत आहेत."
हेमा मालिनी झाल्या भावूक
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी इन्स्टाग्रामवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 'किनारा' चित्रपटातील धर्मेंद्र आणि त्यांचा एकत्र असलेला एक खास फोटो शेअर केला. या फोटोत दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. हेमा यांनी या फोटोसोबत लिहिले की, "'किनारा' चित्रपटातील माझी आणि धरमजींची सर्वात सुंदर आठवण." गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे गीत भूपिंदर यांनी गायले होते आणि संगीत आर.डी. बर्मन यांनी दिले होते.
धर्मेंद्र यांचा अंतिम चित्रपट
धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस' लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सर्वात कमी वयाच्या परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. श्रीराम राघवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, यात अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. २५ डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना त्यांना शेवटचं मोठ्या पडद्यावर बघता येईल.