चांगल्या भूमिका केल्या पण कधीच मोठा पुरस्कार का मिळाला नाही? यामी गौतम स्पष्टच म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:24 IST2025-11-04T15:23:40+5:302025-11-04T15:24:31+5:30
यामी गौतम चांगली अभिनेत्री असून कधीच तिला मोठा पुरस्कार मिळाला नाही. यावर अभिनेत्रीने मौन सोडलंय

चांगल्या भूमिका केल्या पण कधीच मोठा पुरस्कार का मिळाला नाही? यामी गौतम स्पष्टच म्हणाली-
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम ही आपल्या प्रभावी अभिनयासाठी ओळखली जाते. विकी डोनरपासून ते आर्टिकल ३७०पर्यंत तिने अनेक उल्लेखनीय चित्रपट केले. तिच्या अभिनयाचं प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही कौतुक झालं, तरीसुद्धा तिला आजपर्यंत कोणताही मोठा फिल्म अवॉर्ड मिळालेला नाही.
हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत यामी म्हणाली, “मला हा विचार अजिबात त्रास देत नाही की मला पुरस्कार का मिळाले नाहीत. जितकी मी भगवद्गीता वाचली आहे, त्याप्रमाणे मला समजलं की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे सांगितलं ते अगदी खरं आहे. असं नाही की मी एखाद्या आदर्श व्यक्तीसारखी या सगळ्यांपासून पूर्णतः वेगळी झाली आहे, पण जर तुमच्यात यश आणि अपयश या दोन्हीपासून दूर राहण्याची, तसेच इतरांच्या नजरेतून स्वतःला न शोधण्याची क्षमता असेल, तर तुम्ही योग्य मार्गावर आहात.''
''मी आता कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची मान्यता घेणं थांबवलं आहे. जर मला पुरस्कार मिळाला तर मी उत्तम अभिनेत्री आहे, आणि नाही मिळाला तर नाही — असं नाही. माझं काम आणि प्रयत्न हेच माझं खरं यश आहे.”
यामी गौतमला उरी: द सर्जिकल स्ट्राइक, दसवी, आणि आर्टिकल ३७० या चित्रपटांसाठी विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकनं मिळाली होती. विशेषतः बाला आणि आर्टिकल ३७० या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, या सर्व नामांकनांनंतरही ती कोणताही पुरस्कार जिंकू शकली नाही. यामी गौतमचा इमरान हाश्मीसोबतचा आगामी 'हक' हा सिनेमा ७ नोव्हेंबरला सगळीकडे रिलीज होणार आहे.