शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 14:25 IST2025-08-27T14:23:14+5:302025-08-27T14:25:09+5:30
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या अडचणी वाढू शकतात.

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
राजस्थानमधील भरतपूरमध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणसह ७ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार मथुरा गेट पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. यामुळे शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या अडचणी वाढू शकतात. भरतपूरचे रहिवासी कीर्ती सिंह यांनी ही एफआयआर दाखल केली आहे.
भरतपूरमधील वकील कीर्ती सिंह यांनी २०२२ मध्ये एका प्रसिद्ध कार कंपनीकडून सुमारे २४ लाख रुपयांची कार खरेदी केली होती. मात्र, काही काळानंतर गाडीमध्ये 'मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट' असल्याचे लक्षात आले. अनेक वेळा कीर्ती सिंह यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला. वारंवार तक्रारी करूनही कंपनीने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. कंपनीकडून वारंवार आश्वासन दिलं गेलं की गाडी दुरुस्त केली जाईल, पण काहीही केले नाही.
यास कंटाळून कीर्ती सिंह यांनी भरतपूरच्या सीजेएम कोर्ट क्रमांक २ मध्ये अर्ज दाखल केला. न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मथुरा गेट पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ४२० (फसवणूक) आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत, कार कंपनीचे ब्रँड अँबेसेडर असलेल्या शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या नावाचाही समावेश आहे. कीर्ती सिंह यांचा आरोप आहे की या सेलिब्रिटींनी जाणूनबुजून खराब उत्पादनांची जाहिरात केली, ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली. सध्या, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.