फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; म्हणाली, "पॉवर असली की तिथे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 18:01 IST2025-01-27T18:00:41+5:302025-01-27T18:01:03+5:30
फातिमाला साऊथमध्ये आला विचित्र अनुभव

फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; म्हणाली, "पॉवर असली की तिथे..."
'दंगल' गर्ल म्हणून ओळख असलेली फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh). तिने इंडस्ट्रीत वेगळी ओळख बनवली आहे. मात्र दंगल नंतर परत तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही. फातिमाने 'दंगल'च्या खूप संघर्ष केला आहे. अनेक ठिकाणी ऑडिशन्स दिल्या आहेत. यावेळी तिलाही कास्टिंग काऊचचा अनुभव आल्याचं तिने नुकतंच सांगितलं. नक्की काय म्हणाली फातिमा वाचा.
'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत फातिमा सना शेख म्हणाली, "इंडस्ट्रीत चांगले आणि वाईट दोन्ही लोक आहेत. ज्यांच्याकडे पॉवर आहे ते तुमच्या परिस्थितीचा फायदा उचलतात. साऊथमधील एका प्रोजेक्टसाठी कास्टिंग डायरेक्टरने मला विचारलं. माझे प्रोफाईल्स मागितले. नंतर तो म्हणाला की या रोलसाठी सगळं काही करु शकते ना? मी म्हणाले, 'हो भूमिकेसाठी मी आवश्यक ती मेहनत घेईन'. पण नंतर तो मला सतत तेच बोलत होता की सगळं करावं लागेल, तू तयार आहेस ना? तेव्हा मला कळलं आणि मला बघायचं होतं की हा नक्की किती खालच्या थराला जाऊन बोलू शकतो. शेवटी त्याला ते नीट बोलताही आलं नाही आणि त्यालाच त्याची लाज वाटली."
आणखी एक प्रसंग सांगताना ती म्हणाली, "हैदराबादमध्ये सुद्धा असंच घडलं होतं. एका सिनेमासाठी मी काही जणांना भेटले. तर तिथले निर्माते फार विचित्रपणे बोलत होते. अगदी खुलेपणाने नाही पण घुमवून फिरवून विचारायचे. सध्या सगळीकडेच हा प्रकार आहे. ही फार वाईट गोष्ट आहे. पण जिथे पॉवर येते तिथे लोक फसतात. तेव्हाच तुमचं खरं कॅरेक्टर समोर येतं."
फातिमा गेल्यावर्षी 'सॅम बहादुर' सिनेमात दिसली. तसंच तिचा 'धक धक' सिनेमाही आला. यानंतर अद्याप ती कोणत्याही सिनेमात लीड रोलमध्ये दिसलेली नाही.