ठरलेल्या वेळेपेक्षा तीन तास उशीरा आली! माधुरी दीक्षितवर चाहते नाराज, म्हणाले- "आम्हाला पैसे परत द्या"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:15 IST2025-11-04T11:11:54+5:302025-11-04T11:15:12+5:30
माधुरी दीक्षित नुकतीच एका शोमध्ये सहभागी होणार होती. पण तब्बल ३ तास उशीरा आल्याने चाहत्यांनी राग व्यक्त केलाय. काय घडलं?

ठरलेल्या वेळेपेक्षा तीन तास उशीरा आली! माधुरी दीक्षितवर चाहते नाराज, म्हणाले- "आम्हाला पैसे परत द्या"
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) तिच्या 'कॅनडा टूर शो'मुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शोच्या ठिकाणी तब्बल तीन तास उशिरा पोहोचल्यामुळे चाहत्यांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली असून, सोशल मीडियावर त्यांनी रिफंडची मागणी केली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या
माधुरी दीक्षितचा कॅनडातील शो ठराविक वेळेपेक्षा सुमारे तीन तास उशिरा सुरू झाला. यामुळे शोसाठी आलेल्या अनेक चाहत्यांना दीर्घकाळ तिची वाट पाहावी लागली. इतका वेळ वाट पाहिल्यानंतरही व्यवस्थापनाकडून चाहत्यांना योग्य माहिती मिळाली नाही. यामुळे चाहते प्रचंड निराश झाले आणि त्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. अनेक चाहत्यांनी शोचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आपली निराशा व्यक्त केली. त्यांनी या शोला 'आजपर्यंतचा सर्वात वाईट शो' असे म्हटले.
एका यूजरने लिहिले, "आम्ही इतके पैसे देऊन तिकीट खरेदी केले, पण शो इतका उशिरा सुरू झाला. हे पूर्णपणे व्यवस्थापन आणि कलाकारांचे अपयश आहे. आम्हाला रिफंड हवा आहे." दुसऱ्या एका चाहत्याने, "एवढा उशीर येऊन माधुरीने तिच्या भारतीय चाहत्यांचा अपमान केला आहे," असे म्हटले. याशिवाय माधुरीच्या चाहत्यांनी मात्र शोच्या आयोजकांवर राग व्यक्त केला असून त्यांनी जर नीट व्यवस्थापन केलं नसेल तर त्यात माधुरीची काय चूक? असं म्हणत अभिनेत्रीची बाजू घेतली आहे
उशिरा येण्याचे कारण अस्पष्ट
माधुरी दीक्षित किंवा शोच्या आयोजकांनी उशीर होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, चाहते या प्रकरणावर तातडीने स्पष्टीकरण आणि नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. माधुरी दीक्षितने सुद्धा यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये.