'डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझेही आयकॉन आहेत, मी ब्राह्मण नाही...'
By महेश गलांडे | Updated: January 20, 2021 12:01 IST2021-01-20T11:48:44+5:302021-01-20T12:01:44+5:30
दलित अभिनेता वा अभिनेत्री मेरीटलेस असल्याचं रिचा चड्डा यांनी म्हटल्याचा आरोप एका ट्विटर युजर्सने केला होता. कुश आंबेडकरवादी या ट्विटर अकाऊंटवरुन अभिनेत्री रिचा चड्ढाचा व्हिडिओ शेअर करत तीला टार्गेट करण्यात आलंय

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझेही आयकॉन आहेत, मी ब्राह्मण नाही...'
मुंबई - अभिनेत्री रिचा चड्ढाचा ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा सिनेमा येत्या 22 जानेवारीला रिलीज होतोय. पण तत्पूर्वी हा सिनेमा वादात अडकला आहे. चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज झाले आणि या चित्रपटाला विरोध सुरु झाला. या फोटोत रिचा हातात झाडू घेऊन उभी आहे. यावर अनेकांनी आक्षेप घेतला. केवळ आक्षेप नाही तर आता रिचाला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. इतकेच नाही तर तिची जीभ कापणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर, आता रिचा चड्ढा ब्राह्मणवादी असल्याचा आरोप एका आंबेडकरी अनुयायाने केला होता. त्यावर, रिचाने हे खोटं असल्याचं म्हटलंय.
दलित अभिनेता वा अभिनेत्री मेरीटलेस असल्याचं रिचा चड्डा यांनी म्हटल्याचा आरोप एका ट्विटर युजर्सने केला होता. कुश आंबेडकरवादी या ट्विटर अकाऊंटवरुन अभिनेत्री रिचा चड्ढाचा व्हिडिओ शेअर करत तीला टार्गेट करण्यात आलंय. रिचा चड्डा यांनी आंबेडकरांचा फोटो असलेला टी-शर्ट केवळ आंबेडकरांना विकण्यासाठी घातला होता. मात्र, तिच्या ब्राह्मणवादी विष पूर्णपणे भरलेलं आहे, असे ट्विट या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे. रिचा चड्डानेही या ट्विटला रिट्विट करत उत्तर दिलंय.
रिचा चड्डा का नकाब उत्तर चुका है। https://t.co/M5S0USB7mW
— कुश अम्बेडकरवादी (کش) (@Kush_voice) January 20, 2021
मी असे कधीही आणि कुठेही म्हटलं नाही. आंबेडकर माझेही आयकॉन आहेत. त्यांचा टी-शर्ट परिधान करणे हा माझाही अधिकार आहे. विशेष म्हणजे मी ब्राह्मण नाही, हे लक्षात ठेवा, खोटारडे.. असे उत्तरादाखल ट्विट रिचाने केलंय.
रिचाला सिनेमावरुन धमक्या
एका मुलाखतीत रिचाने स्वत: याची माहिती दिली. तिने सांगितले, ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा सिनेमा एका रिअल लीडरवर बनलेला आहे, या गैरसमजातून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. माझे पोस्टर जाळण्याच्या, माझ्या घरावर हल्ला करण्याच्या, माझ्यावर गोळ्या झाडण्याच्या धमक्या मिळत आहेत. पण आम्ही या धमक्यांकडे दुर्लक्ष केले आहे. धमक्या देणारे तेच लोक आहेत,ज्यांना प्रसिद्धी हवी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या धमक्यांना भीक न घालणे हाच त्यांना थोपवण्याचा उत्तम मार्ग आहे. दरम्यान, ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा सिनेमा उत्तर प्रदेशातील एका माजी मुख्यमंत्र्याच्या आयुष्यावर प्रेरित असल्याचे सांगितले जातेय. मेकर्सनी मात्र ही एक काल्पनिक कथा असल्याचे स्पष्ट केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने रिचाचा गौरव
कोरोना काळात गरजुंना मदत आणि सामाजिक विषयांवर आधारीत चित्रपट केल्यामुळे अभिनेत्री रिचा चड्ढाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते महाराष्ट्र सरकारने हा पुरस्कार देऊन रिचाचा सन्मान केला होता. त्यावेळी, बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहतानाचा एक फोटो रिचाना शेअर केला होता. त्यासोबत, हा पुरस्कार स्विकारल्याचाही फोटो शेअर करत आभार व्यक्त करताना जय भीम आणि जय हिंद, असेही लिहिले होते.