"तो कायम दुःखी गाणी गायचा, त्यामुळे..."; अरिजीत सिंगच्या निवृत्तीच्या निर्णयावर अनुराग कश्यपची रोखठोक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:00 IST2026-02-17T12:55:51+5:302026-02-17T13:00:37+5:30
अरिजीतने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्ट करुन पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याबाबत संकेत दिले होते. आता अरिजीतच्या निर्णयावर दिग्दर्शक अनुराग कश्यपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काय म्हणाला अरिजीत?

"तो कायम दुःखी गाणी गायचा, त्यामुळे..."; अरिजीत सिंगच्या निवृत्तीच्या निर्णयावर अनुराग कश्यपची रोखठोक प्रतिक्रिया
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंग सध्या त्याच्या निवृत्तीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. अरिजीतने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्ट करुन पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याबाबत संकेत दिले होते. त्याच्या या विधानामुळे लाखो चाहते चिंतेत असतानाच, प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने अरिजीतच्या निर्णयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काय म्हणाला अरिजीत?
अनुराग कश्यपचे रोखठोक मत
ट्राइड अँड रिफ्यूज प्रोडक्शनला दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग कश्यपला अरिजीत सिंगच्या निवृत्तीबद्दल विचारण्यात आले. त्यावर अनुराग म्हणाला की, "अरिजीत सिंगने निवृत्तीचे संकेत देण्यामागील मुख्य कारण म्हणजे, तो वारंवार त्याच प्रकारचे गाणे गाऊन थकलेला आहे. विशेषतः तो नेहमीच 'हार्टब्रेक' किंवा दुःखद गाणी गायचा. त्याला अशाच पद्धतीची गाणी गाण्यासाठी कायम विचारणा केली जायची. त्याला केवळ एकाच पठडीतील गाण्यांमध्ये अडकून राहायचे नाहीये, कारण त्याचे कौशल्य आणि प्रतिभा या हार्टब्रेक गाण्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक मोठी आहे.''
अरिजित काय म्हणाला होता?
सोशल मीडिया पेजवर अरिजीत सिंगने म्हटले की, यापुढे मी पार्श्वगायक म्हणून नवे कामे स्वीकारणार नाही. पण, स्वतंत्रपणे संगीतनिर्मिती सुरू ठेवणार आहे, तसेच हाती असलेली आधीची सर्व कामे पूर्ण करणार आहे. त्यामुळे यावर्षी माझी काही गाणी प्रदर्शित होऊ शकतात. मी चांगल्या संगीताचा चाहता आहे. त्यादृष्टीने भविष्यात आणखी गोष्टी शिकत राहणार आहे.
अरिजीतच्या निवृत्तीच्या बातम्यांमुळे सोशल मीडियावर त्याचे चाहते भावूक झाले आहेत. अनेकांनी "अरिजीतशिवाय बॉलिवूड संगीत अपूर्ण आहे," अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अरिजीतने पार्श्वगायनातून निवृत्ती जरी घेतली असली तरी तो लाईव्ह म्यूझिक कॉन्सर्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. काहीच दिवसांपूर्वी अरिजीतने निवृत्तीनंतरचा पहिला म्यूझिक कॉन्सर्ट केला होता.